ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदारांचे निलंबन करणाऱ्या घटनेचा निषेध

केंद्र सरकारकडून लोकशाहीची हत्या ; जिल्हा, शहर काँग्रेस कमिटीचे आयोजन

चांदा ब्लास्ट

सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. तर, लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. यासर्व बाबी संविधानात नमूद आहेत. मात्र, अधिवेशन काळात संसदेत घडलेल्या स्मोक हल्ल्याच्या घटनेवर निवेदनाची मागणी करणाऱ्या तब्बल १४२ खासदारांचे केंद्र सरकारने निलंबन केले आहे. यातून केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (ता. २२) दुपारी ३.३०  वाजता गांधी चौकात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, कामगार नेते प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांची उपस्थिती होती.   भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून करण्यात आली. या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नींची उत्तरे देण्याऐवजी केंद्र सरकारने १४२ खासदारांचे निलंबन केले आहे. हा लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असल्याचे मत आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी व्यक्त केले.

केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढते, ही एक प्रकारे लोकशाही तत्वांची हत्या आहे. लोकशाहीला स्मशान बनविण्याचे काम भाजपकडून सातत्याने होत असल्याचा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने संविधानातील नियमांना पायदळी तुडविण्याचे काम सुरू केले आहे. खासदारांचे निलंबन करून हुकुमशाही वृत्तीची प्रचिती देशाला दाखवून दिली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात आपण आता पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने एकत्रितपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले. प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनीसुद्धा केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, विनोद दत्तात्रेय, गोपाल अमृतकर, अरुण भेलके, नंदू नागरकर, संतोष लहामगे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, रमिज शेख, कुणाल चहारे, प्रशांत भारती, सुनीता अग्रवाल, विना खनके, सकिना अन्सारी, उमाकांत धांडे, भालचंद्र दानव, राहुल चौधरी, हर्षित रामटेके, युसूफ भाई, पप्पू सिद्दीकी, दुर्गेश कोडाम, गोस खान, प्रमोद बोरीकर, मुन्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रशांत दानव, नौशाद शेख, पितांबर कश्यप, दुर्गेश कोडाम यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये