शांती नगर वासीयांचे आंदोलन यशस्वी
लॉयड्स कंपनीने केली नाली व रस्त्याच्या कामाची सुरुवात

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील लॉयड्स मेटल्स कंपनीच्या स्थापनेदरम्यान 1995 साली शांती नगर ही वस्ती उभारण्यात आली होती. कंपनीने त्या वेळी घरपट्ट्यांचे आश्वासन दिले होते, मात्र स्थलांतरानंतर कंपनी व नगरपरिषद प्रशासनाने या वस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. परिणामी, नाल्याअभावी सर्वत्र चिखल, झुडपांचे जंगल, तसेच साप-विंचवांचा धोका निर्माण होऊन नागरिकांची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली होती.
नागरिकांच्या मदतीला महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा यास्मिन सैय्यद धावून आल्या. त्यांनी प्रशासनाला अल्टीमेटम दिला की, जर समस्या त्वरित सोडवल्या नाहीत, तर शांती नगरचे रहिवासी 15 ऑगस्ट रोजी वर्धा नदीत सामूहिक जलसमाधी घेतील. या इशाऱ्याने प्रशासन व कंपनीचे डोळे उघडले. अखेर 14 ऑगस्ट रोजी लॉयड्स कंपनीने शांती नगर येथील नाली व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले.
या आंदोलनाला यश मिळाले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या विनंतीवरून यास्मिन सैय्यद यांनी जलसमाधी आंदोलनाची सांगता जाहीर केली. या आंदोलनातून महिला शक्तीचे बळ व नागरिकांच्या एकीची ताकद अधोरेखित झाली आहे.