ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट

दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी चांदा पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या या पर्वाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रध्वजाला सलामी देत ध्वजा रोहणाने झाली. त्यानंतर ‘लक्ष न ओझल..’ व ‘रंग ऐसा भरो…’ हे देशभक्तिपर गीत विद्यार्थ्यांनी मोठ्या अभिमानाने गाऊन संपूर्ण वातावरण देशभक्तिमय केले.

या दिवशी महात्मा गांधी, पंडित नेहरू, मंगल पांडे, भगतसिंग, सुभाष चंद्र बोस यांसारख्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची विद्यार्थ्यांच्या मनात आठवण ठेवण्याकरिता इयत्ता 8वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका तेजल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली 1857 च्या उठावाचे उत्कृष्ट रित्या सादरीकरण केले तसेच इयत्ता 1 ते 10 मधील विद्यार्थ्यांच्या भाषणाचे प्रस्तुतीकरण झाले.

यावेळी सन 2024-25 मध्ये शाळेत 100 टक्के उपस्थिती पूर्ण करणारे व वर्गात प्रथम स्थान प्राप्त करणारे विद्यार्थी तसेच सी.बी.एस.ई. 10वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करणारे विद्यार्थी अश्मित मक्कड, शौर्य प्रसाद, अथर्व उमाटे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना भविष्यातही देशप्रेम जपण्याचा सल्ला दिला.

शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्य दिनाचा इतिहास, स्वातंत्र्यसंनिकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत निभावयाची भूमिका यावर प्रेरणादायी विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांसमवेत शिक्षिका मेघा शुक्ला यांनी तर आभार प्रदर्शन रूहीना मलक सय्यद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम प्रमुख वंदना बोरसरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये