“माझी वसुंधरा 6.0” अभियानाच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “माझी वसुंधरा अभियान 6.0” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चंद्रपूर महानगरपालिका सभागृहात उपायुक्त श्री. संदीप चिद्रवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान अभियानाची रूपरेषा व अंमलबजावणीसंदर्भातील विविध घटकांची पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित उपक्रमांद्वारे पर्यावरणाचे संरक्षण व नागरिकांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबवली जात आहे.
बैठकीत वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबवायच्या उपाययोजना, MIS पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया, टूलकिटचे पालन आणि मूल्यांकन प्रक्रियेचे महत्त्व या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी शहर अभियंता रविंद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,अनिलकुमार घुले, संतोष गर्गेलवार, रविंद्र कळंबे, डॉ. अमोल शेळके, डॉ. नयना उत्तरवार,गिरीराज,शहर समन्व्यक जय धामट (माझी वसुंधरा अभियान) उपस्थित होते.
“माझी वसुंधरा” अभियानाचा प्रारंभ 2 ऑक्टोबर 2020 रोजी झाला असून, यावर्षी 5 जून 2025 रोजी सहाव्या टप्प्याचा (6.0) औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे. MIS अहवाल सादरीकरण, डेस्कटॉप मूल्यांकन आणि क्षेत्रीय तपासणी या तीन महत्त्वपूर्ण निकषांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यांकन करण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात येईल. ही मोहीम पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी व शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांप्रती महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.