ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिपाइं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती, आघाडी करण्यासोबतच स्वबळावर लढणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका कोरपनाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती, आघाडी,करण्यासोबतच स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्याच्या उद्देशाने रविवार दिनांक २७ जुलै रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका कोरपनाची बैठक संपन्न झाली.

माजी प्राचार्य रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोककुमार उमरे, भंते कश्यप, प्रा. भानुदास पाटील, चिंतामण घुले, ईश्वर आत्राम, जगदीश धवने, नेमीचंद कातकर, भिमराव भगत, प्रकाश कवाडे, शिवाजी धुपे, वारलूजी नळे, सुनील वालदे, नवीन केवट, देवराव भगत, यशवंत पथाडे, अनंताभाऊ रामटेके, सुरजभाऊ उपरे, आकाश ताकसांडे इत्यादीची उपस्थिती होती.

बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने आगामी ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याच्या संदर्भात साधकबाधक चर्चा करण्यात आली. पक्षानी जिथे जमेल तिथे समविचारी पक्षांशी युती, आघाडी करून आणि नाही जमल्यास निवडून येणाऱ्या संभाव्य जागेवर स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूकीला सर्व ताकदीनिशी सामोरे जायचे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

रिपाइंच्या तालुका शाखेने तालुक्याचे निर्णय घेतले असले तरी पक्षादेश सर्वोतोपरी आहे, असा एकमुखी ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यासंबंधात रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस आद. डॉ राजेंद्र गवई साहेब अमरावती यांच्याशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेण्यात येईल.

सदर बैठकीत सोलापूर येथे दिनांक १५ जून २०२५ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. एन. राजिंद्रन कर्नाटक आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षांनी घेतलेल्या ठरावाची माहिती सदर बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना देण्यात आली.

सोलापूर येथील राष्ट्रीय अधिवेशनात ठरल्याप्रमाणे पक्ष सभासद नोंदणी करताना आधार कार्ड नंबर शिवाय सभासद नोंदणी करायची नाही. तसेच पक्षात आर्थिक पारदर्शकता आणण्यासाठी सभासद नोंदणीचे शुल्क हे केवळ पक्षाच्या नावाने चेक आणि डीडी द्वारा करायचे आहे.

तसेच समता सैनिक दल हे अगदी बाबासाहेबांच्या कारकिर्दीपासून बाबासाहेबांच्या राजकीय पक्षांच्या आघाडीची फौज म्हणून संलग्नित आहे. बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेच्या विरोधकांनी रिपाइंचा फार मोठ्या प्रमाणात अपप्रचार केल्याने रिपाइंचे समता सैनिक दलाकडे झालेल्या दुर्लक्षाचा विचार करून सोलापूर अधिवेशनात ससैद ला रिपाइंशी संलग्नित केल्यामुळे गावं तिथे रिपाइंच्या शाखेसोबतच समता सैनिक दलाची शाखा पुर्ण ताकदीने निर्माण करायच्या आहेत. तसेच युवा आणि विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या पक्ष संघटना आणि विचाराची गोडी निर्माण करून चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी शाळा, महाविद्यालयात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या शाखा निर्माण करायच्या आहेत.

सदर बैठकीत अध्यक्षाची परवानगी घेऊन अशोककुमार उमरे यांनी जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात होणाऱ्या सर्व पक्षीय आंदोलनात रिपाइंने सहभागी व्हायचे की काय यांचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीत घेतल्यानंतर कळविण्यात येईल.

सदर बैठकीत नेमीचंद कातकर, जगदीश धवने, प्रकाश कवाडे, सुरजभाऊ उपरे, अनंताभाऊ रामटेके, वारलूजी नळे, ईश्वर आत्राम, शिवाजी धुपे इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला.

 प्रास्ताविक आणि संचालन अशोककुमार उमरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन ईश्वर आत्राम यांनी केले.

बैठकीचे औचित्य साधून रिपाइंचे कार्यकर्ते शिवाजी धुपे यांच्या माध्यमातून ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये