चंद्रपूर मनपातर्फे एक विद्यार्थी एक झाड स्पर्धा
मनपा क्षेत्रातील सर्व शाळांचा असणार सहभाग

चांदा ब्लास्ट
विद्यार्थी लावणार “एक पेड मां के नाम”
सध्याच्या काळातील वाढते वातावरणीय बदल, तीव्र उन्हाळा व अतिवृष्टी यामुळे निर्माण झालेले असमतोल आणि वृक्षांची घटती संख्या ही एक गंभीर समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून वृक्ष लागवड ही प्रत्येकाची जबाबदारी असून, हे राष्ट्रीय कर्तव्य मानून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे लवकरच घेण्यात येणाऱ्या “एक विद्यार्थी, एक झाड” स्पर्धेत सर्व शाळांनी भाग घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले.
मनपा क्षेत्रातील शासकीय व खाजगी सर्व शाळांसाठी वृक्ष लागवडीबाबत बैठक मनपा सभागृहात आयोजीत करण्यात आली होती, या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,घटत चाललेल्या हरित क्षेत्राची भरपाई करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. “एक विद्यार्थी, एक झाड” स्पर्धा हा त्याच दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल असुन स्पर्धेमध्ये शाळांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपणास चालना द्यावी.
हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र या अभियांनातर्गत वर्ष 2025 करिता 10 कोटी वृक्ष लागवड मोहिम अंतर्गत वृक्षारोपण मोहिम राबविण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. वृक्ष लागवडीसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने 50 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एक विद्यार्थी, एक झाड स्पर्धा व एक पेड माँ के नाम या उपक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणे. लहान वयातच पर्यावरण रक्षणाचे संस्कार रुजवणे ही भूमिका आहे.
शहराचे ग्रीन झोन वाढविण्यास घेण्यात येणाऱ्या एक पौधा एक विद्यार्थी स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करणे,वृक्षाचे संवर्धन व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार असुन स्पर्धेसाठी लागणारी आवश्यक ती झाडे मनपातर्फे पुरविण्यात येणार आहे. सहभागी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दिले जाणार असुन त्या झाडाचे संगोपन व संवर्धन त्या विद्यार्थ्याला करावयाचे आहे. वृक्षाचे संगोपन कसे सुरु आहे याची माहिती संबंधित शिक्षकांद्वारे घेतली जाणार असुन झाडाचे संगोपन करून वाढविल्याबद्दल प्रमाणपत्र,ट्रॉफीसोबतच अतिरिक्त 20 गुणसुद्धा शाळेतर्फे दिले जाणार आहे.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेश पातळे,विस्तार अधिकारी मनोज गौरकार,उपअभियंता रवींद्र कळंबे, चैतन्य चोरे,मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत,स्वयंसेवी संस्था, मोठ्या संख्येने शाळांचे मुख्याध्यापक तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.