आदिवासींची पदभरती तात्काळ सुरू करा
आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आदिवासींची 12,500 पदांची पदभरती रखडली असल्याने आदिवासी युवा बेरोजगारांना त्याचा मानसिक त्रास होत असून हजारो आदिवासी युवा बेरोजगार आहेत.त्यामुळे या गंभीर समस्यांची लागलीच दखल घेऊन रखडलेली पदभरती तात्काळ करून आदिवासी युवक बेरोजगारांना न्याय द्यावा अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या युवा परिषद विदर्भ विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बोगस आदिवासींनी बळकावलेल्या जागा रिक्त करून त्यात खऱ्या आदिवासींची पदभरती करावी, वर्ग तीन व चार रोजंदारी रोजगारांना रोजंदारी आदेश द्यावेत, पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावर नियुक्ती आदेश कायमस्वरूपी करावे अशा मागण्याही सदर निवेदनातून करण्यात आले आहे. यावेळी समाज संघटक चिंतामण आत्राम, कोषाध्यक्ष दत्ताजी गावंडे,शुभम आत्राम आदी उपस्थित होते.