रणमोचन येथील शेतकऱ्यांचे डोंग्या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
ब्रह्मपुरी :- तालुक्यात मागील आठवड्याभरात भरपुर पाऊस पडला व अतिवृष्टी झाली. त्यामुळे वैनगंगा नदीला आलेल्या त्या पुरात रणमोचन येथील शेतकऱ्यांचा डोंगा वाहून गेल्याने मोठे संकट ओढवले आहे.
शेतकऱ्यांना भूति नाल्याच्या पात्रातून दररोज जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. सदर बाब आपत्ती व्यवस्थापन मार्फत येत असल्याने शासन स्थरावरून तहसीलदारांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन डोंगा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. या मागणी संदर्भात रणमोचन येथील शेतकऱ्यांनी ब्रह्मपुरीचे तहसीलदार सतीश मासाळ यांना निवेदन देऊन डोंगा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
रणमोचन येथील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती ही बोळेगाव शेत शिवारात आहे. बोळेगाव शेतशिवारात जाण्यासाठी भूती नाला ओलांडून जावे लागते. भुतिनाल्याला पावसाळ्यात पाणी राहत असल्यामुळे डोंग्याशिवाय पर्याय नाही. अगोदर हा डोंगा गावकऱ्यांकडे उपलब्ध होता. मात्र तो पुरात वाहून गेल्याने मोठी भीषण समस्या उद्भवली आहे. डोंगा उपलब्ध झाला नाही तर रणमोचन येथील शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवावी लागणार आहे. या मागणीकडे लक्ष वेधून आमची समस्या सोडवून द्यावी अशी मागणी रणमोचन येथील शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
यावेळी निवेदन देताना रणमोचन ग्रामपंचायत उपसरपंच सदाशिव ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान, गोवर्धन दोनाडकर, विनोद दोनाडकर, वामन दर्वे, रमेश ढोरे, भाऊराव दोनाडकर, दादाजी मेश्राम, शंकर दोनाडकर, जनार्दन सहारे, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.