खोदलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन खोदकाम करुन नका – आ. किशोर जोरगेवार
शहरातील सिवरेज लाईन आणि अमृत योजनेच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी

चांदा ब्लास्ट
शहरातील सिवरेज लाईन आणि अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह पाहणी केली. शहरातील बहुतांश रस्ते खोदण्यात आले असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. खोदलेले रस्ते दुरुस्ती झाल्याशिवाय नवीण खोदकाम न करण्याचे सक्त निर्देश यावेळी त्यांनी अधिका-यांना दिले आहे.
यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता रविंद्र हजारे, एमजीपीचे कापसे, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदिप किरणे, दिवाकर पूटड्डवार यांच्यासह कंत्राटदारांची व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पाहणी दरम्यान आमदार जोरगेवार यांनी खोदलेले रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याशिवाय पुढील कोणतेही खोदकाम सुरू करू नये. नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, आधी खोदलेले आणि निकृष्ट अवस्थेत असलेले रस्ते तातडीने डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही निर्देश दिले.
रस्त्यांची दुरवस्था, धुळीचे लोट, वाहतुकीतील अडथळे आणि पावसाळ्यात होणारे चिखलाचे साम्राज्य यामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कामे करताना जनतेचा त्रास कमी करण्याचे कर्तव्य प्रशासनाचे आहे. नागरिकांनीही जर डागडुजी न झाल्यास अशा नवीन खोदकामाला विरोध करावा असे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. शहरातील पायाभूत सुविधांशी संबंधित ही कामे महत्त्वाची असली तरी त्याच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. कामांची गुणवत्ता, वेळेत होणारी दुरुस्ती आणि योग्य व्यवस्थापन या सर्व बाबींवर लक्ष ठेवले जाईल, असे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवरी कॉलरी, महाकाली कॉलरी परिसरासह शहरातील इतर भागांची पाहणी केली