ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धेत आंबेडकर जयंतीची चार दिवस धूम!

मॅराथॉन,रांगोळी,नृत्य स्पर्धा,प्रबोधन व संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

श्रुती जैन यांच्या सकाळ निळ्या पाखरांची संगीतमय कार्यक्रमाचीही मेजवानी

वर्धा – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, सिव्हील लाईन येथे ११ ते १४ एप्रिल यादरम्यान चार दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मॅराथॉन, रांगोळी,नृत्य स्पर्धा, प्रबोधन व संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून श्रुती जैन यांच्या सकाळ निळ्या पाखरांची या संगीतमय कार्यक्रमाची मेजवानीही मिळणार आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू असून आंबेडकर जयंतीची चार दिवस शहरात धूम राहणार आहे.

शुक्रवार ११ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सकाळी ६ वाजता मॅरार्थान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मॅराथॉनची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरूवात होईल. सायंकाळी ५.३० वाजता जयंती महोत्सवाचे उद्घाटन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी वान्मथी सी. राहतील. प्रमुख वक्ते म्हणून सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. जी. कांबळे, नगररचना व मूल्य निर्धारण विभाग नागपूरचे सहसंचालक विजय शेंडे राहतील. सायंकाळी ७ वाजता गायक राहुल तायडे, प्रीती तायडे, दीपाली पांडे यांचा संगीतमय कार्यक्रम होईल.

शनिवार १२ रोजी प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त महिला व पुरुष खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता प्रबोधन कार्यक्रम आयोजित असून अध्यक्षस्थानी टिनी बिल्डर्स, मुंबई येथील देवानंद रंगारी, प्रमुख वक्ते समता सैनिक दलाचे संजय ओरके, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, संजय इंगळे तिगावकर, डॉ. गणेश जवादे, प्रा. डॉ. चंदू पोपटकर उपस्थित राहतील. सायंकाळी ७ वाजता भीम गितांवर आधारित नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे.

रविवार १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रबोधन कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी खासदार अमर काळे राहतील. प्रमुख वक्ते म्हणून रेडिओ निवेदक जगदीश भगत तर प्रमुख अतिथी म्हणून जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे संचालक वैभव धवन, महावितरण ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता अनंतकुमार भगत, श्री संताजी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर चाफले, प्रसिद्ध साहित्यिक व लेखक प्रा. प्रमोद नारायणे उपस्थित राहतील. सायंकाळी ७ वाजता स्वप्नील गणवीर आणि प्रशांत गवई यांचा एसपी रॉक म्युझिकल बॅण्डचा कार्यक्रम सादर करतील.

 सोमवार १४ रोजी सामूहिक बुद्ध वंदना होईल. तर पहाटे ४.४५ वाजता श्रुती जैन यांचा सकाळ निळ्या पाखरांची हा संगीतमय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आदित्य गावंडे यांच्या हस्ते होईल. सायंकाळी ५.३० वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी नेते अ‍ॅड. विजय आगलावे, प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर,

खासदार अमर काळे ,प्रमुख वक्ते आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे, प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. डॉ. विकास साठे, पत्रकार विनोद राऊत, उद्योजक महेश गुल्हाने, नालंदा अकॅडमीचे संचालक अनूपकुमार उपस्थित राहतील. यावेळी सेवालय आश्रम येथील विद्यार्थ्यांना नोटबूक-पेनचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

सायंकाळी ७ वाजता राहुल साठे यांचा भिमवादन संगीतमय कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये