ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये भाजप नेत्यांच्या देशद्रोही वक्तव्याचा काँग्रेसकडून तीव्र निषेध

जोडे व शेण मारून निषेध आंदोलन

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपुर): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या यशस्वी कारवाईनंतरही भाजपचे नेते लष्कर व तिरंग्याचा अपमान करीत असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

शहर काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली घुग्घुसमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. भाजपचे मध्यप्रदेशातील मंत्री विजय शाह व उपमुख्यमंत्री जगदीश देवाडे यांच्या प्रतीकात्मक चित्रांना जोडे, चप्पल व शेण मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

“देश की सेना का अपमान नही सहेगा हिंदुस्थान! तिरंगे का अपमान नही सहेगा हिंदुस्थान!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांची बहीण म्हटल्याने संतप्त भावना उसळल्या आहेत. यावर उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, मात्र अद्याप भाजपने या मंत्र्याला पदावरून हटवलेले नाही.

तसेच उपमुख्यमंत्री जगदीश देवाडे यांनीही लष्कराचा अवमान करणारे विधान करत त्यांना पंतप्रधानांच्या चरणी नतमस्तक असल्याचे म्हटले. याशिवाय, भाजपचे राजस्थानातील आमदार बालमुकुंद आचार्य यांनी तिरंग्याच्या दुपट्ट्याचा अपमान करत नाक पुसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

या निषेध आंदोलनात काँग्रेसचे सैय्यद अनवर, रोशन दंतलवार, अजय उपाध्ये, विशाल मादर, शेख शमिउद्दीन, अनिरुद्ध आवळे, शहजाद शेख, राजकुमार वर्मा, पदमा त्रिवेणी, यास्मिन सैय्यद, दुर्गा पाटील, संध्या मंडल, जोया शेख, वैशाली पोपटकर, बालकिशन कुळसंगे, दीपक पेंदोर आदींसह असंख्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काँग्रेसने भाजपच्या नेत्यांच्या देशविरोधी व सैन्यविरोधी वक्तव्यांचा जाहीर निषेध करत सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये