नोंदी सुटलेल्या जन्म – मृत्यूच्या आदेश प्रक्रिया सुलभ करा _ समीर निमगडे यांची मागणी
तहसीलदार मार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
गोंडपिपरी :- तेलंगणा सीमेवरील आदिवासीबहुल गोंडपिपरी तालुक्यात अनेक ग्रामपंचायती अंतर्गत जन्म आणि मृत्यूच्या नोंदी अनावधानाने सुटले आहेत.अशा प्रकरणात जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करिता अनेक ग्रामस्थ शासकीय कार्यालयाच्या हेलपाट्या मारताना दिसतात.मात्र ही प्रक्रिया जटिल,क्लिष्ट आणि खर्चिक असल्याने सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तेव्हा नोंदी सुटलेल्या जन्म आणि मृत्यूच्या आदेशाची प्रक्रिया सुलभ आणि सोपी करण्याची मागणी करंजी ग्रामपंचायत सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे यांनी केली आहे.या संदर्भातील निवेदन गोंडपिपरीच्या तहसीलदारा मार्फतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक नागरिकांचे जन्म आणि मृत्यू या संदर्भातल्या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी अनावधानाने झाल्या नाहीत.मात्र अलीकडच्या दिवसांमध्ये सर्वच कारभार ऑनलाईन झाला आहे.तेव्हा ज्यांचे जन्म नोंद आणि मृत्यूच्या नोंदी नाहीत,अशांना आता जन्म आणि मृत्यू दाखले हरएक कामासाठी लागत आहेत.तेव्हा नोंद नसलेल्या व्यक्तीस नोंदीच्या आदेश मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.पूर्वी हा कारभार तहसील कार्यालयातून चालायचा.मात्र आता उपविभागीय अधिकारी कार्यालयात हा विभाग वळविण्यात आला.असे असताना एक नव्हे तर अनेक कागदपत्रे यासाठी जुळवावी लागत आहेत.ग्रामपंचायत,पंचायत समिती,तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय असा कागदपत्राचा प्रवास होत आहे.यानंतर कागदपत्रांचा हाच प्रवास परतीचा सुरू होतो.आणि ग्रामपंचायतला येऊन थांबतो.
अनेक टप्प्यातून होणारी ही प्रक्रिया त्रासदायक ठरत आहे.यामुळे तालुक्यातील जनसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ही प्रक्रिया क्लिष्ट आणि खर्चिक सुद्धा आहे.तेव्हा अनावधानाने नोंद न केलेल्या जन्म आणि मृत्यू दाखल्याच्या आदेशाकरिता राबविण्यात येणारी ही प्रक्रिया सुलभ करावी,अशी मागणी करंजी ग्रामपंचायतचे सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे यांनी केली आहे.या संदर्भातील निवेदन त्यांनी गोंडपिपरीच्या तहसीलदारा मार्फतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.
पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकाऱ्याकडे हा विभाग देण्यात आला.एका ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मार्फतीने हे टेबल हाताळल्या जात आहे.दप्तर दिरंगाईमुळे या प्रक्रियेस विलंब होत आहे.



