वन अकादमीला ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

चांदा ब्लास्ट
गुणवत्ता, शाश्वत पर्यावरणीय व्यवस्थापन आणि वनसंवर्धनाच्या दिशेने घेतलेल्या पुढाकारांची दखल घेत चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन अकादमीला (वन अकादमी) प्रतिष्ठित ‘आयएसओ ९००१:२०१५’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र अकादमीला पर्यावरण व्यवस्थापन, वन व्यवस्थापन, वन्यजीव संरक्षण, वनाग्नी प्रतिबंध, इको-टुरिझम व मानव-प्राणी संघर्ष निवारण या क्षेत्रात दाखविलेल्या उत्कृष्टतेबद्दल मिळाले आहे. अकादमीची कार्यप्रणाली, प्रशिक्षण पद्धती व व्यवस्थापन प्रणाली जागतिक दर्जाच्या निकषांनुसार आहेत, हे यावरून सिध्द झाल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी म्हटले आहे.
सोबतच भारत सरकारच्या Capacity Building Commission कडून अकादमीला “Very Good” (ट्रिपल स्टार) प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आले आहे.
वन अकादमीबद्दल माहिती : १९६१ मध्ये ‘वनपाल प्रशिक्षण विद्यालय’ म्हणून सुरू झालेली ही संस्था आज ४४.५ हेक्टर परिसरात विस्तारली असून त्यात १६ प्रशिक्षण कक्ष, ४ प्रेक्षागृहे, अधिकारी निवासस्थाने, महिला व पुरुष प्रशिक्षणार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, क्रीडा संकुल, व्यायामशाळा आणि आधुनिक डिजिटल वर्ग यांचा समावेश आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रात्यक्षिक अनुभव, क्षेत्रभेटी व तांत्रिक कौशल्य विकासावर आधारित असून, पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज अशा भावी वन अधिकाऱ्यांची घडण या माध्यमातून केली जाते. शासनाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात या अकादमीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून ती शाश्वत वनीकरण, जैवविविधता संवर्धन व पर्यावरणीय नेतृत्व क्षेत्रात ठोस भूमिका बजावत आहे.