अनिकेत परसावार यांचा प्रथम क्रमांक
महाभारत आधारित माइम ॲक्टची प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांना भुरळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बल्लारपूर तर्फे आयोजित टॅलेंट का महाकुंभ – ऑरा २०२५ या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेने कलाक्षेत्रात एक वेगळी छाप उमटवली. या स्पर्धेत क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. मूव्ही मेकिंग, डी.जे. वॉर, सिंगिंग, डान्सिंग, ओपन माइक, क्विझ कॉम्पिटिशन आणि ड्रामा कॉम्पिटिशन यासारख्या स्पर्धांनी विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे संपूर्ण श्रेय बी. आय. टी. चे कार्यकारी अध्यक्ष संजय वासाडे यांना जाते. त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक पारितोषिके आणि रोख बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती.
यातील सर्वांत लक्षवेधी आणि प्रभावी सादरीकरण ठरले चित्रपट व नाट्य लेखक-दिग्दर्शक अनिकेत परसावार यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेले महाभारतावर आधारित माइम ॲक्ट आणि लोकनाट्य सादर केले. यातील प्रत्येक दृश्य, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, आणि प्रभावी मूकाभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या अद्वितीय सादरीकरणाने ड्रामा कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवून उपस्थितांचे मन जिंकले.
हा उपक्रम अनिकेत परसावार बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत राबवण्यात आला. या अभिनय सादरीकरणात अर्पित जागणे, कृष्णा केवट, शाझिया शेख, तनिष्का शर्मा, खुशी वाटणे आणि जोहंथान कॉटर या बी. आय. टी. पॉलिटेक्निकच्या प्रथम आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या अप्रतिम समन्वयाने आणि अभिनय कौशल्याने या कलाकृतीला वेगळ्या उंचीवर नेले.
कार्यक्रमाच्या समारोपाला इंडियन आयडल १० चे विजेते सलमान अली यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने संपूर्ण वातावरण संगीतमय केले. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांनी उपस्थितांना एका वेगळ्याच आनंदात लीन केले.
बी. आय. टी. ऑरा २०२५ हा केवळ एक कार्यक्रम नसून नव्या पिढीच्या कलागुणांना चालना देणारे, त्यांच्या भविष्यासाठी दिशा ठरू शकणारे एक भव्य व्यासपीठ ठरले आहे. या संपूर्ण यशस्वी कार्यक्रमासाठी सहभागी विद्यार्थी, संस्थेचे व्यवस्थापन आणि आयोजक मंडळाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.