विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्या साथी ‘संवाद’ आवश्यक – डॉ. राजेश इंगोले
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात पालक-शिक्षक संवाद पार पडला

चांदा ब्लास्ट
महाविद्यालये किंवा विद्यापीठ हे फक्त औपचारीक शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे व्यासपीठ आहे. त्यामुळे विद्यार्थी- शिक्षक- पालक यामध्ये नियमित संवाद, चर्चा होणे आवश्यक असून याचसाठी एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईचे, महार्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे विद्यार्थिनींच्या पालकांसाठी विशेष बैठक मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी मार्गदर्शन केले व या बैठकीला डॉ. बाळू राठोड, सहाय्यक कुलसचिव प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. राजेश इंगोले यांनी विविध विभागांमध्ये दिल्या जाणाऱ्या इंटर्नशिपची सविस्तर माहिती पालकांना दिली. त्यांनी या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींना उद्योग आणि व्यवहारज्ञान कसे मिळते याबाबत समजावून सांगितले सोबतच पालक आणि शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित संवाद होणे गरजेचे असल्याचे मत यावेडी व्यक्त केले.
डॉ. वेदानंद अलमस्त यांनी शैक्षणिक सत्र २०२३ पासून सुरू झालेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांनी गेस्ट लेक्चर, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच ICCC कॉन्फरन्स यासारख्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक कार्यक्रमांविषयी थोडक्यात माहिती दिली.
बैठकीत बीएमएस, बी.कॉम, बी.व्होक फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, बी.ए फॅशन डिझायनिंग, बी.व्होक इंटिरियर डिझाईन, बी.एस्सी आयटी, बीसीए या विभागांच्या प्राध्यापकांनी आपल्या विभागांतील अभ्यासक्रम, संधी, आणि भविष्यातील प्रगतीची माहिती सविस्तर दिली. विविध विभागांतील उपक्रम आणि विद्यार्थी विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत पालकांना अवगत करण्यात आले. सोबतच आपल्या विद्यार्थिनींच्या प्रगति विषयी ही या वेळी चर्चा केली. सदर बैठकीत पालकांनीही विद्यार्थीहिताच्या सूचना केल्या, चर्चा केली व संवाद साधला. सोबतच अशा पालक प्राध्यापक बैठका नियमित काही महिन्याच्या अंतरावर घेण्याची विनंती आवराच्या संचालकाकडे केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका शितल बिल्लोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका दीपिका उमरे यांनी केले.