घुग्घुस नगर परिषदेची प्लास्टिकविरोधी कारवाई
२५ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त, दंडही वसूल

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : नगर परिषद घुग्घुसतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२६ तसेच “माझी वसुंधरा अभियान ७.०” अंतर्गत प्लास्टिक प्रदूषणाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. “कापडी पिशवीचा स्वीकार करा, प्लास्टिकचा बहिष्कार करा” तसेच “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत” अशा संदेशांसह शहरात जनजागृती आणि कारवाई करण्यात आली.
नगर परिषदेच्या माहितीनुसार, दिनांक २६ मे २०२६ रोजी घुग्घुस नगर परिषद क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक बंदी संदर्भात विशेष जप्ती मोहीम राबविण्यात आली. यावेळी सुमारे २५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडही वसूल करण्यात आला.
ही कारवाई मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत स्वच्छता निरीक्षक अनिल डांगोरे, शहर समन्वयक लुमिता नागपुरे यांच्यासह सर्व मुकादम आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर बंद करून नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.



