ताज्या घडामोडी

खाजगी दलालासह आरटीओ सहा. निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक – अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची राजुरा तालुक्यात मोठी कारवाई

भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सीमावर्ती भागातून अंमली पदार्थ तसेच गोवंशाची तस्करी - प्रदीप गेडाम ह्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्याजवळ महाराष्ट्र तेलंगणा राज्य सीमेवर असलेल्या आरटीओ तपासणी नाक्यावर प्राप्त तक्रारीनुसार सापळा रचुन ट्रक चालकाकडून 500/- रुपयांची लाच घेताना आरटीओ सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते व नाक्यावरील अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी नेमलेला खाजगी दलाल जगदीश डफडे ह्याला रंगेहात अटक केली असुन दोन्ही आरोपींना राजुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार आंतरराज्यीय वाहतूक करणाऱ्या एका व्यावसायिकाला लक्कडकोट येथिल आरटीओ तपासणी नाक्यावर वारंवार लाच मागण्यात येत होती. सततच्या त्रासाला कंटाळून सदर व्यावसायिकाचा ट्रक चालक शेख मोहसिन शेख मोबिन ह्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती. ह्या तक्रारीच्या अनुषंगाने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार दिनांक 21फेब्रुवारी 2025 च्या रात्री संबंधित चेक नाक्यावर सापळा रचुन आरटीओ सहा. निरीक्षक शिवाजी विभुते व त्याचा खाजगी दलाल जगदीश डफडे ह्याला लाच घेताना रंगेहात अटक करून त्यांच्या झडतीत 56100/- रुपयांची रोख रक्कम जप्त केली असुन आरोपींना राजुरा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात असुन संबंधित आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 व 7 अ नुसार राजुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन बातमी लिहित पर्यंत आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले नव्हते.

लक्कडकोट येथिल आरटीओ तपासणी नाका नेहमीच चर्चेत असतो. ह्या ठिकाणी नेमणुक होण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असल्याची चर्चाही होत असते. ह्या चढाओढीत ज्याची बोली जास्त त्याची नेमणुक असा अघोषित नियम असल्याचेही बोलल्या जाते. अर्थात लावलेल्या बोलीपेक्षा जास्त वसुली करण्याचा गोरखधंदा आरटीओ अधिकाऱ्यांकडून होत असल्यास नवल नाही. राज्य सीमेवर असलेल्या ह्या तपासणी नाक्यावरून रोज शेकडो मालवाहू वाहनांची रवानगी होत असते. शेजारील राज्यातून क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहने राजरोसपणे महाराष्ट्रात प्रवेश करत असतात. बल्लारपूर पेपर उद्योगासाठी लागणाऱ्या लाकडांचा पुरवठा देखील ह्याच मार्गाने होतो. ही लाकूड वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजनाची व नियमापेक्षा जास्त उंचीपर्यंत लाकुड भरून वाहतुक करतात. ह्या वाहनांमधून कित्येकदा लाकडे घसरून अपघात होण्याची स्थिती निर्माण होते मात्र तरीही आर्थिक लाभासाठी ह्याकडे दुर्लक्ष केल्या जाते.

भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सीमावर्ती भागातून अंमली पदार्थ तसेच गोवंशाची तस्करी

सदर लाच प्रकरण समोर येताच शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन चे सदस्य प्रदिप गेडाम ह्यांनी राजुरा येथे पत्रकार परिषद घेऊन आरटीओ प्रशासनावर गंभीर आरोप केले असुन संबंधित विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सीमावर्ती भागातून राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ तसेच प्रतिबंधित तंबाखूची तस्करी होत असल्याचे सांगितले तसेच महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा लागु आहे, गोवंशाची अवैध वाहतुक बंदी आहे मात्र लक्कडकोट येथिल तपासणी नाक्यावरून मोठ्या प्रमाणात गोवंशाची हत्येसाठी तेलंगणा राज्यात अवैध तस्करी होत असून आरटीओ अधिकारी आर्थिक लाभासाठी ही अवैध वाहतुक करण्यास सहकार्य करीत असल्याचा गंभीर आरोप प्रदिप गेडाम ह्यांनी केला. त्याचप्रमाणे ह्या तपासणी नाक्यावरून होणाऱ्या वाहतुकीदरम्यान प्रत्येक वाहनाकडून वाहनाच्या क्षमतेनुसार आपल्या दलालामार्फत अवैध वसुली केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

ह्याशिवाय आरटीओ कार्यालय हे भ्रष्टाचाराचे केंद्र बनले असुन ह्याठिकाणी नागरिकांना प्रत्येक कामासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्काच्या अनेकपट रक्कम द्यावी लागते व ती न दिल्यास नागरिकांचे कोणतेही काम केल्या जात नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

 

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये