ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,कवी,कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केल्या जातो.

कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा दिवस याचे औचित्य साधून राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली

आणि प्रायमरीच्या मुलांनी स्वागत नृत्य सादर केले. तसेच वर्ग सहावीतील मुलींनी ‘हे जन्मभूमी हे कर्मभूमी’ हे गीत गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले व माध्यमिक च्या मुलांनी मराठी मातृभाषेचे महत्त्व भाषणातून समजावून सांगितले. तसेच शुद्धलेखन स्पर्धा आणि निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी विषयाचे शिक्षक ज्ञानेश्वर शेरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कश्याप्रकारे मातृभाषा माणसाचा सर्वांगीण विकास करते.

तसेच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती महत्त्वाचे मार्गदर्शक ठरतात परंतु आपण त्यांची तुलना आपल्या आई-वडिलांसोबत करू शकत नाही, त्याच पद्धतीने आपल्या अलंकारिक मराठी भाषेची तुलना इतर भाषेसोबत करणे चुकीचे आहे. तसेच हर्षा सरकटे मॅडम यांनी कुसुमाग्रजांची कणा ही कविता सादर केली. यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा मीनलताई शेळके तसेच सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके, सीईओ सुजित गुप्ता सर, मुख्याध्यापिका डॉक्टर प्रियंका देशमुख मॅडम, उपमुख्याध्यापक फैजल ओस्मानी सर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग आठवीतील कोमल गरड व सुप्रिया गाडेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पल्लवी संत मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये