गावात शिरून बिबट्याने तीन बकऱ्यांना केले ठार
भद्रावती तालुक्यातील तांडा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गावात शिरून गोठ्यात बांधलेल्या तीन बकऱ्यांना बिबट्याने ठार केल्याने तांडा गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. सदर घटना तालुक्यातील तांडा गावात दिनांक 30 ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. या घटनेत बकरी मालकाचे जवळपास 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते.तांडा येथील सोनू धारावत या महिलेच्या घरालगत गोठ्यात बकऱ्या बांधलेल्या होत्या.
मध्यरात्रीनंतर केव्हातरी बिबट्याने गावात शिरून गोठ्यातील तीन बकऱ्यांना ठार केले. गेल्या काही दिवसांपासून तांडा गाव परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भद्रावती वन विभागातर्फे दोन पिंजरे लावण्यात आले आहे. गावात बिबट्या आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.