ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतमाता माफ कर… आम्ही तुला पुन्हा एकदा गुलाम करतोय!

कविसंमेलनाने केले अंतर्मुख : अस्वस्थ वर्तमानाला भिडणाऱ्या कवितांचे सादरीकरण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी महापुरुषांनी आयुष्य पणाला लावल्याने उपेक्षित वंचितांना उजेडाच्या वाटा मिळाल्या. पण, पूर्वजांचा हा तेजस्वी त्याग विसरून आपण धर्मांध, सत्तांध व स्वार्थांध होऊ लागल्याने ‘भारतमाता माफ कर…आम्ही तुला पुन्हा एकदा गुलाम करतोय !’ अशा अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी चंद्रपुरातील कविसंमेलन गाजले. अस्वस्थ वर्तमानाला भिडणाऱ्या कवितांचे सादरीकरण हे संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले होते.

जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात प्रब्रह्मानंद मडावी यांच्या ‘क्रांतियोद्धा जननायक बिरसा मुंडा’ या ग्रंथ प्रकाशनानिमित्त रविवारी कविसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवयित्री डॉ. पद्मरेखा धनकर, विशेष अतिथी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नीलकांत कुलसंगे, सूत्रसंचालक डॉ. किशोर कवठे, लेखक प्रब्रह्मानंद मडावी व मान्यवर उपस्थित होते. बल्लारपूरच्या अर्जुमनबानो शेख यांनी ‘हे भारतमाता माफ कर’ ही आशय संपन्न कविता सादर केली. गोंडपिपरीचे संतोषकुमार उईके यांच्या ‘क्रांतीची धगधगती ज्वाला बिरसा मुंडा’ या कवितेने परिवर्तनाचे हाकारे दिले. चंद्रपूरचे ज्येष्ठ कवी प्रदीप देशमुख यांच्या ‘दीन’दर्शिका या उपरोधिक कवितेने रसिकांच्या डोळ्यांत अंजन घातले. गडचिरोलीच्या मालती सेमले यांची ‘तत्पर हो लढण्यास बांधवास तत्पर हो लढण्यास’ या गेय कवितेने बिरसा मुंडांचा उलगुलान संदेश मांडला. राज्य सरकारने एसटी तिकीट हाफ केल्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जानगरचे सुरेंद्र इंगळे यांची ‘हाफ तिकीट’ ही कविता भाव खाऊन गेली. नरेशकुमार बोरीकर, धनंजय साळवे, गीता देव्हारे़, विजय वाटेकर, सुधाकर कन्नाके यांच्या कविताही रसिकप्रिय ठरल्या. प्रा. संदीप गायकवाड, प्रवीण आडेकर, परमानंद जेंगठे, संतोषकुमार उईके, धर्मेंद्र कन्नाके, प्रब्रह्मानंद मडावी यांच्या जीवनवादी कवितांनी रंगत आणली.

कवितेचा प्रांत समृद्ध होऊ लागलाय- डॉ. पद्मरेखा धनकर

चंद्रपूर जिल्ह्याला साहित्याची समृद्ध परंपरा आहे. नवदृष्टी लाभलेले कवी वर्तमानातील दाहक प्रश्नांचा वेध घेत उत्तम लेखन करीत आहेत. त्यामुळे कवितेचा प्रांत आता समृद्ध होत आहे, असा आशावाद लेखिका डॉ. पद्मरेखा धनकर यांनी व्यक्त केला. कवींनी सादर केलेल्या कवितांचा साक्षेपी आढावा घेऊन त्यातील सामर्थ्यस्थळेही विशद केली. डॉ. किशोर कवठे यांच्या ललितरम्य व प्रसिद्ध रचनांची पखरण करणाऱ्या सूत्रसंचालनाने रसिकांचा आनंद उंचावला. त्यांची ‘मी तसा खूप खालून आलो वेदनेच्या मुळातून आलो’ ही अस्सल मातीची कविताही लक्षवेधी ठरली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये