बेलगाव येथे अरुणोदय सिकल सेल तपासणी व जनजागृती अभियान संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा, अंतर्गत उपकेंद्र पिपरडा येथील बेलगाव गावात अरुणोदय सिकल सेल तपासणी व जनजागृती अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या अभियानांतर्गत गावातील नागरिकांना सिकल सेल आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कुलभूषण मोरे माणसेवी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा यांनी उपस्थित नागरिकांना सिकल सेल आजाराची कारणे, लक्षणे, तपासणीचे महत्त्व, उपचार व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली. सिकल सेल आजार लवकर ओळखल्यास योग्य उपचाराने रुग्णांचे जीवनमान सुधारू शकते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अभियानादरम्यान गावातील युवक, महिला व नागरिकांची सिकल सेल तपासणी करण्यात आली तसेच समुपदेशन करून आवश्यक आरोग्य सल्ला देण्यात आला.
या उपक्रमात मंजुषा शेंद्रे (सी.एच.ओ.), आशा वर्कर सगुना सिडाम यांची सक्रिय उपस्थिती व सहकार्य लाभले.
गावकऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागात अशा आरोग्य जनजागृती व तपासणी मोहिमा नियमितपणे राबविल्यास सिकल सेलसारख्या आनुवंशिक आजारावर प्रभावी नियंत्रण मिळू शकते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



