दोन व आठ वर्षीय चिमुरड्यांना जिनिंगमधिल वाहनाने चिरडले – एकीचा जागीच मृत्यू तर दुसरा इस्पितळात मृत घोषित
किसान जिनिंग येथिल घटना

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
राजुरा तालुका मुख्यालयापसून तेलंगणा राज्यात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवघ्या सात किलोमिटर अंतरावर असलेल्या तुलाना येथिल किसान जिनिंगमधे काम करणाऱ्या मजुरांचे दोन चिमुकले निशा कुमारी समारुराम उईके (वय २) (मु. छतीसगढ) व प्रेम ज्ञानेश्वर कस्टकार (वय ८) (मु. इंदिरा नगर) ही दोन्ही बालके पालक जीनिंग मधील कामात व्यस्त असताना जिनींग परिसरात खेळत होते. दरम्यान कापूस जमा करणाऱ्या मशीनने दोघांनाही चिरडल्याची घटना (दि. ११) रोज सोमवारला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेतील दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यु झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आल्याने राजुरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राजुरा असिफाबाद महामार्गावर तुलाना गावाजवळ असलेल्या किसान जिनिंग येथे मजुरी करणाऱ्या मजुरांचे दोन मुले जिनिंगाच्या आत खेळत होते. याच वेळेला जिनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापूस एकत्र करण्यासाठी मशीन सुरू होती. मशीन चालकाला मुले खेळत असल्याचे लक्षात न आल्याने खेळत असलेल्या दोन्ही बालके मशीनने चिरडल्या गेली. ह्या अपघातात निशा कुमारी ही दोन वर्षीय मुलगी जागेवर मृत पावली तर आठ वर्षीय प्रेम ला उपचाराकरिता उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे आणण्यात आले होते मात्र रुग्णालयात प्रेम याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दोन्ही चिमुरड्यांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांनी तसेच इतर कामगारांनी रोष व्यक्त करत जिनिंग संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दवाखान्यात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.