नत्थू कॉलनी व दूध डेरी परिसरातील नागरिकांची गंभीर समस्या
चिकन वेस्ट व्यवस्थापनाचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा फाटा येथे चिकन मार्केटमध्ये निर्माण होणारे चिकन वेस्ट पेट्रोल पंप जवळ उघड्यावर टाकत असल्याने नत्थू कॉलनी व दूध डेरी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या अस्वच्छतेमुळे दुर्गंधी, माशा व आजारपणाचा धोका वाढत असून याठिकाणी कुत्र्यांचा मोठा हैदोस आहेत. नागरिकांचे दैनंदिन जीवन अतिशय कठीण झाले आहे.
ग्रामपंचायतीला वारंवार कळवूनही या गंभीर समस्येकडे योग्य तोडगा निघालेला नाही. चिकन वेस्टची विल्हेवाट न लावल्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होत असून, हे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे
नांदा फाटा चिकन मार्केटमध्ये ग्रामपंचायतीने एक ट्रॅक्टर ट्रॉली कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी व दररोज रात्रीच्या वेळेस हा कचरा दूरवर नेऊन टाकावा. याशिवाय ग्रामपंचायतीचा घनकचरा प्रकल्प सध्या सुरू असल्याने त्याठिकाणी देखील हा वेस्ट जमा करून टाकण्याची व्यवस्था केली जाऊ शकते.
तसेच चिकन व मटन दुकानधारकांना त्यांच्या वेस्टेज मटेरियलसाठी स्वतंत्र ट्रॅक्टर ट्रॉली किंवा अन्य पर्यायी सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.
मागील पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायत पदाधिकारी वारंवार निवडून येत आहेत, मात्र नागरिकांची ही मूलभूत समस्या अद्यापही कायम आहे. पदाधिकारी दिल्लीपासून परदेशापर्यंत सोशल मीडियावर पोस्ट्स व्हायरल करण्यात व्यस्त आहेत, परंतु स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, ही खेदजनक बाब आहे
ग्रामपंचायतीने लवकरात लवकर या चिकन वेस्ट व्यवस्थापनाचा ठोस व शाश्वत तोडगा काढावा. अशी नागरिकांची मागणी आहे.