Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवास प्रारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

प्रतितिरुपती अर्थात विदर्भाचे तिरुपती बालाजी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या स्थानिक श्री बालाजी महाराज मंदिरामध्ये दिनांक ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करून श्री बालाजी महाराजांच्या यात्रा उत्सवास सुरुवात झाली.

श्री बालाजी महाराजांच्या मंदिरावर दरवर्षीप्रमाणे विधिवत पूजन करून नवीन पताका फडकविण्यात आली. 332 वर्षापेक्षा अधिक काळापासून ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराज मंदिरामध्ये सकाळी मानकरी सुवर्णकार समाजाने दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे विधिवत श्री बालाजी महाराजांचे सोन्याचे दागिने, सिंहासन तथा चांदीचे पूजेचे साहित्य उजळून दिले. सुवर्णकार समाजाचा या सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. श्री बालाजी महाराजांचा यात्रा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी २१ ब्रम्हवृंद श्रींच्या मंदिरात अनुष्ठानास बसले. श्री बालाजी महाराज, लक्ष्मीमाता व पद्मावती माता यांच्या मूर्तीचे ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात पुजारी यांनी विधिवत अभिषेक केले. यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. सायंकाळी असंख्य भक्तांच्या उपस्थितीत श्री बालाजी महाराजांची महाआरती करण्यात आली.

श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात सर्व विधी नियोजनबद्ध पार पडले. घटस्थापनेप्रसंगी संस्थानचे व्यवस्थापक किशोर बीडकर, आशिष वैद्य, मानकरी, संस्थान मधील कर्मचारी, ब्राम्हण वृंद व श्री बालाजी भक्त मंदिरात उपस्थित होते.

दि. 11 ऑक्टोबर रोजी मंडपोत्सव होणार असून 12ऑक्टोबर ला दसऱ्याच्या मध्यरात्री 12 वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येईल. श्रींची पालखी 13 ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालून मंदिरात पोहचेल. 21 ऑक्टोबर रोजी सूर्योदयी 5 वाजून 45 मिनिटांनी लळीत उत्सव संपन्न होईल, अशी माहिती श्री बालाजी संस्थानच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये