घुग्घुस नगर परिषद कडून पावसाळापूर्व तयारीसाठी नोटीस जारी
नाल्यांवरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर – घुग्घुस नगर परिषद कार्यालयाने पावसाळापूर्व तयारी २०२५ अंतर्गत एक महत्त्वाची नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे की, शहरातील सर्व प्रमुख नाले आणि गटारांची तातडीने सफाई करणे आवश्यक आहे. मात्र काही नागरिकांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे हे काम अडथळ्यांत आले आहे.
नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, ज्यांनी नाल्यांवर अतिक्रमण केले आहे, त्यांनी नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत स्वेच्छेने अतिक्रमण हटवावे. अन्यथा नगर परिषद स्वतः अतिक्रमण हटवेल आणि त्याचा संपूर्ण खर्च व जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल.
ही कारवाई महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक क्षेत्र विकास अधिनियम १९६५, महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियम २००५ आणि घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ अंतर्गत केली जाणार आहे. या नोटीसवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. निलेश रंजनकर यांची सही असून, त्यांनी नागरिकांना वेळेत अतिक्रमण हटवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्या अजूनही प्रलंबित
सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन नगर प्रशासनाला दिले होते. मात्र हे निवेदन अद्यापही प्रलंबित आहे. ना कुठली ठोस कारवाई झाली आहे, ना कोणताही अधिकारी जबाबदारी स्वीकारायला तयार दिसतो.
स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे की ही नोटीस केवळ औपचारिकता आहे का? की कोणत्यातरी ठेकेदार अथवा माफियांना फायदा करून देण्यासाठी कायद्याचा धाक दाखवून बेकायदेशीर वसुली केली जात आहे? या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे आणि कारवाई निष्पक्ष असणे आवश्यक आहे.
आता पाहावे लागेल की नगर परिषद प्रशासन बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांवर खरोखरच कठोर कारवाई करते की अशा लोकांना संरक्षण देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करते. सद्यस्थितीत नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील हालचालीकडे लागले आहे.