गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात मुक्त विद्यापीठ आणि दूरस्थ शिक्षण अभ्यासकेंद्रांना परवानगी देऊ नये
गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनची कुलगुरूकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
-गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये मुक्त विद्यापीठ, दूरस्थ शिक्षण तसेच इतर विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रांना परवानगी न देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे आणि सचिव डॉ.विवेक गोर्लावार यांनी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांचे कडे केली आहे.
गोंडवाना विद्यापीठ व सलग्नित महाविद्यालय अंतर्गत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून याबाबत विद्यापीठाच्या विद्या परिषद, सिनेट व व्यवस्थापन परिषदेमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे.यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत उपरोक्त प्राधिकरणाने अभिप्राय दिला आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ,रामटेक, इंदिरा गांधी हिंदी विश्वविद्यालय, वर्धा, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठाचे अभ्यास केंद्रे सुरू असल्यामुळे गोंडवाना विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येवर फार गंभीर परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. आपल्या विद्यापीठाची एकूण विद्यार्थी संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 20 हजाराने कमी झालेली आहे त्यामुळे महाविद्यालयातील अनेक शैक्षणीक तुकड्या बंद होऊन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत ही अत्यंत चिंतनीय बाब आहे. अशीच परिस्थिती राहिली तर विद्यार्थी अभावी भविष्यात अनेक महाविद्यालय बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ए.आय. एस.एच. ई. ने अहवालात महाराष्ट्रातील एकूण 405 अनुदानित महाविद्यालयातील पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सत्र 22 -23 च्या तुलनेत 23 -24 मध्ये अत्यंत कमी होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली असून त्याची गंभीर दखल घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अधिसभेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांना जिल्हाबंदी केली असून विद्यापीठ परिक्षेत्रात अभ्यास केंद्रे उघडताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याबाबत ठराव अधिसभेत पास केलेला आहे.
गोंडवाना विद्यापीठाची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत असून यावर नियंत्रण व उपाययोजना म्हणून मुक्त विद्यापीठ, दूरस्थ शिक्षण तसेच इतर विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रांना विद्यापीठ परिक्षेत्रात अभ्यास केंद्रे उघडताना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ची पुर्व परवानगी घ्यावी असा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांचे कडे केली आहे.