Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

आगामी विधानसभा निवडणुकीत निमकर फॅक्टर ठरणार निर्णायक

निमकरांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला - जन्मदिवसानिमित्त भव्य महिला व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे घोंगावू लागले असून सर्वच राजकीय पक्षात उमेदवारीसाठी चढाओढ बघायला मिळत असतानाच राजुरा विधानसभा क्षेत्र ह्याला अपवाद ठरले तर नवल. ह्याच अनुषंगाने राजुरा विधानसभा क्षेत्रातून माजी आमदार भाजपा नेते सुदर्शन निमकर ह्यांनी शड्डू ठोकला असुन क्षेत्रात निमकर फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला १ लाख ३० हजारांच्यावर मतदान मिळाले. व यात भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा २ लाख ६० ह‌जारांच्यावर मतांनी विजय झाला. यात राजुरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला तब्बल ५८,९०३, एव्हढे प्रचंड मताधिक्य मिळाले. ह्या विजयामुळे त्याचप्रमाणे प्राप्त मताधिक्यामुळे काँग्रेस गोटात निवडणुकीपूर्वीच विजयाचा जल्लोष होत असल्याचे चित्र असले तरीही हे मताधिक्य केवळ काँग्रेस पक्षाचे नसून लोकसभेच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचा सक्षम उमेद‌वार नसल्यामुळे शेतकरी संघटनेची मते काँग्रेस विरोधी विचारसरणीचे असतांनासु‌द्धा सहानुभूती तसेच जातीय समीकरणांमुळे काँग्रेसच्या उमेद‌वार प्रतिभा धानोरकर यांच्या पारड्यात गेली हे निर्विवाद सत्य आहे.

लोकसभा निवड‌णुकीत राजुरा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला ७१ हजार मतदान मिळाले असले तरी या मतदारसंघात भाजपचे साधारणतः ५० हजार मतदार आहेत, गोंडवाना गणतंत्र पार्टीचा उमेदवार प्रभावी नसल्यामुळे व साधारणतः आदिवासी मतदारांचा डीएनए काँग्रेस विचारसरणीचा असल्यामुळे त्या मतदारांनी सु‌द्धा काँग्रेसला कौल दिल्याचे लक्षात येते.

परंतू आगामी विधानसभेची निवडणूक ही प्रामुख्याने महाविकास आघाडी, भाजप प्रणित महायुती, शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचितसह इतरही पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याने ही निवडणूक तिरंगी प्रसंगी चौरंगी होऊन निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार सुभाष घोटे उमेदवार असणार आहे. शेतकरी संघटनेकडून प्रत्येक निवडणुकीसाठी वामनराव चटप एकमेव उमेद‌वार आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून स्वर्गिय गोदरू पाटील जुमनाके यांचे चिरंजिव जिवती न.प. चे माजी नगराध्यक्ष गजानन पाटील जुमनाके किंवा त्यांच्या मातोश्री जि.प.च्या माजी सदस्य तथा विद्यमान नगरसेविका श्रीमती सतलुबाई जुमनाके हया निवडणुक लढविणार असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र भाजपकडून अजुनपर्यंत कुणाचेही नांव निश्चित नसले तरी राजुरा विधानसभा क्षेत्राकरीता निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेले देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर व लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

या मतदार संघातील मागिल निवडणुकांचे अवलोकन केले असता निमकर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. आजही निमकर यांचा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क आहे, २०१४ च्या निवडणुकीत निमकरांनी या मतदारसंघात राष्ट्र‌वादी काँग्रेस पक्षाचे काहीही अस्तित्व नसताना ऐनवेळी घड्याळ चिन्ह घेऊन ३० हजार मतदारांचा विश्वास संपादन केल्याचे दाखवून दिले. त्यांना मिळालेल्या ह्या मतदानात जास्तीत जास्त मतदान हे काँग्रेस विचारसरणीच्या मतदारांनी केल्यामुळे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांचा २३०० मतांनी पराभव होऊन अँड संजय धोटे ह्यांच्या रूपाने विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा कमळ फुलले. परंतू २०१९ च्या निवडणुकीत सुदर्शन निमकर यांनी निवडणूक न लढता भाजपमध्ये प्रवेश केला व अत्यंत चुरशीच्या तिरंगी लढतीत पुन्हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा २५०० मतांनी निसटता विजय झाला.

2019 च्या निवडणुकीत भाजपचे तत्कालीन आमदार ॲड. संजय धोटे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. या मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ७१ हजार मतदान मिळाले असले तरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे साधारणतः ५० हजार मतदार आहेत. सध्यास्थितीत काँग्रेस ७० हजार, शेतकरी संघटना ५० हजार, भाजप ५० हजार गोंगपा ३५ हजार व इतर मतदार लक्षात घेता सामना अटीतटीचा होणार आहे. यात माजी आमदार निमकर यांना उमेदवारी दिल्यास भाजपचे ५० हजार व निमकरांचे निष्ठावंत असलेले १५ हजार मते अशी 65000 मतांची बेगमी झाली असुन, काँग्रेसचे असंतुष्ट मतदार व जातीय समीकरणात वामनराव चटप व सुदर्शन निमकर यांचा धनोजे कुणबी समाजामध्ये असलेला प्रभाव लक्षात घेता जातीय मतांची होणारी वाढ निमकरांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुकर होऊ शकते.

कुठल्याही संवैधनिक पदावर नसतानाही सुदर्शन निमकर ह्यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात दांडग्या जनसंपर्क ठेवला असुन क्षेत्रात कुठलीही लहान मोठी घटना अथवा कार्यक्रम असल्यास माजी आमदार निमकर सर्वत्र उपस्थिती लावत असतात हे सर्वश्रृत आहे. सामान्य जनांच्या हिताच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या राजकीय कौशल्यासह राजकीय संबंधाचा वापर करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे कार्य सातत्याने सुरू असते हे विशेष. राजुरा तालुक्यातील पुरातन मात्र काळाच्या ओघात मोडकळीस आलेल्या सिद्‌धेश्वर मंदीराच्या पुनर्निर्माणाकरीता पालकमंत्री ना  सुधिर मुनगंटीवार यांचे माध्यमातून २६ कोटी रु. प्राप्त करवून घेण्यासाठी निमकरांचे प्रयत्न आहे. त्यासोबतच सिद्धेश्यावर मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाले असून तिथे होणाऱ्या विकासकामांची देखरेख माजी आमदार निमकर स्वतः करीत आहेत ह्यामुळे देखिल निमकरांच्या पारड्यात लक्षणीय मतदान होण्याची शक्यता असल्याचे मतदारसंघात बोलल्या जात आहे.

एकंदरीत विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात निमकर हे गेमचेंजरची भुमिका बजावण्याची शक्यता आहे. सातत्याने जाहिर कार्यक्रमांचे आयोजन करून प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळविण्याऐवजी आपल्या विकासकामांची तसेच प्रत्यक्ष जनसंपर्क करून मतदारांशी जिव्हाळ्याचे नाते तयार करण्याच्या त्यांच्या कार्यशैलिमुळे निमकर ह्यांची नियोजनबध्द वाटचाल सुरू आहे हे नक्की. आगामी निवडणुकीत पक्षनेतृत्त्व कुणावर या मतदारसंघाची लढाई लढण्याची जबाबदारी देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

माजी आमदार निमकारांनी केलेली लक्षणीय विकासकामांची यादी मोठी असुन त्यातील निवडक कामे ह्याप्रमाणे आहेत.

• दुर्गम आदीवासी बहुल जिवती तालूक्याची निर्मिती निमकरांच्या प्रयत्नामु‌ळे झालामूळे निमकर हे जिवती तालू‌क्याचे शिल्पकार आहे.

• बंद असलेल्या नक्षलग्रस्त भागाच्या विकासाकरीता असलेला विशेष कृती कार्यक्रम सुरु करण्याचे श्रेय निमकरांना आहे.

• खनिज विकास निधीची (सी एस आर फंड) सुरुवात निमकरांच्या पाठपुरात्यामूळे झालेली होती हे विशेष.

• अमलमाला धरणाची उंची वाढविल्याचे श्रेय निमकरांनाच जाते.

•  भेंडाळा मध्यम सिंचन प्रकल्पाला मंजूरी करण्याचे श्रेय निमकरांनाच आहे.

•  भोई समाजातीलच पोट जाती असलेल्या पण खुल्या प्रवर्गात असलेल्या भनार, भनारा, भनारी या अत्यंत गरीब व दुर्लक्षित जातींना विमुक्त भटक्या जमाती या प्रवर्गात निमकर यांच्या प्रयत्नामुळे समावेश झाल्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील या जातीच्या हजारो गरिबांचा फायदा झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये