Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरीता अर्ज करण्यास सुशिक्षित बेरोजगारांना प्रोत्साहित करा – जिल्हाधिकारी गौडा

23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळावा ; प्रशिक्षणार्थी म्हणून मिळणार थेट नियुक्ती

चांदा ब्लास्ट

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनापैकी एक असलेली ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’ करीता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना अर्ज करण्यास प्रोत्साहित करा. तसेच जिल्हयातील सर्व आस्थापनांनी या योजनेची आपल्या स्तरावरून तातडीने निवड प्रक्रिया राबवावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या. तसेच 23 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात पात्र युवक-युवतींना शैक्षाणिक पात्रतेनुसार प्रशिक्षणार्थी म्हणून थेट नियुक्ती मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवक-युवतींनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शासनाच्या महास्वयंम पोर्टलवर तांत्रिक अडचण आल्याने शासकीय तथा खाजगी आस्थापनांनी उमेदवारांची निवड करतांना शासन निर्णयातील अटी – शर्तीनुसार ऑफलाईन पध्दतीने थेट प्रक्षिणार्थी म्हणून नियुक्ती द्यावी. निवड झालेल्या उमेदवारास प्रशिक्षणाच्या कालावधीत उपस्थितीनुसार शासनामार्फत विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यालयास तसेच खाजगी आस्थापनांना प्रशिक्षणार्थीच्या विद्यावेतनांच्य निधीची आवश्यकता असणार नाही. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा व त्यांची कौशल्यवृध्दी व्हावी, त्यामुळे त्यांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

पुढे ते म्हणाले, शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखांना एकुण मंजुर पदाच्या 5 टक्के इतक्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी निवड करता येणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी आपल्या कार्यालयाअंतर्गत प्रशिक्षणार्थी निवडीचे दिलेले उदिष्ट पूर्ण करावे. जेणेकरून जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांना या योजनांचा फायदा होईल. प्रशिक्षणार्थीना शैक्षणिक पात्रतेनुसार दैनंदिन कामकाज सोपवावे. कुठल्याही प्रकारे त्यांच्या मानसन्मानास धक्का पोहचणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित आस्थापनांमार्फत अनुभव प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सांगितले.

मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन : जिल्हयातील सर्व सुशिक्षीत बेरोजगारांनी शैक्षणिक पात्रतेच्या मुळ कागदपत्रासह नियोजन भवन, चंद्रपूर येथे 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांच्यासह विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी तथा खाजगी आस्थापना, उद्योग, महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 उमेदवारांची पात्रता : 12 वी पास, विविध ट्रेडमधील आय.टी.आय., पदविधारक, पदवी आणि पदव्युत्तर. विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/ उद्योग/महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेणे व कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना फक्त एकाच वेळेस या योजनेचा लाभ घेता येईल.

विद्यावेतन: 12 वी पास करीता प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविका करीता प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर करीता प्रतिमहा 10 हजार रुपये याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल.

अधिक माहिती करीता संपर्क : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, चंद्रपूर येथे तसेच दूरध्वनी क्रमांक 07172- 252295 या क्रमांकावर संपर्क साधावा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये