घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री बालाजी महाराज अश्विन यात्रा उत्सवास प्रारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रतितिरूपती अर्थात विदर्भाचे तिरुपती बालाजी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या शहरातील श्री बालाजी महाराज मंदिरामध्ये आश्विन शु. १ सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना करून श्री बालाजी महाराजांच्या आश्विन यात्रा उत्सवास सुरुवात झाली. श्री बालाजी महाराजांच्या मंदिरावर दरवर्षीप्रमाणे विधिवत पूजन करून नवीन पताका फडकविण्यात आली. ३३३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराज मंदिरामध्ये सकाळी मानकरी सुवर्णकार समाजाने दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे विधीवत श्री बालाजी महाराजांचे सोन्याचे दागिने, सिंहासने तथा चांदीचे पूजेचे साहित्य उजळून दिले. श्री बालाजी संस्थानच्या वतीने सुवर्णकार समाजाचा या सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.
श्री बालाजी महाराजांचा यात्रा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी २१ ब्राम्हणवृंद श्रींच्या मंदिरात अनुष्ठानास बसले. श्री बालाजी महाराज, लक्ष्मीमाता व पद्मावतीमाता यांच्या मूर्तीचे ब्राह्मणवृंदांच्या मंत्रोच्चारात पूजारी यांनी विधीवत अभिषेक केले. यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. सायंकाळी असंख्य भक्तांच्या उपस्थितीत श्री बालाजी महाराजांची महाआरती करण्यात आली.
घटस्थापनेप्रसंगी श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक किशोर बीडकर, मानकरी, ब्राम्हणवृंद व श्री बालाजी भक्त मंदिरामध्ये उपस्थित होते.
आश्विन शु. ८, मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी मंडपोत्सव होणार असून आश्विन शु. ९, बुधवार, दि. १ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मध्यरात्री १२ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येईल. श्रींची पालखी आश्विन शु. १०, गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालून मंदिरात पोहचेल. आश्विन कृ. ४ शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सूर्योदयी ५ वाजून ४५ मिनिटांनी लळित उत्सव संपन्न होईल, अशी माहिती श्री बालाजी संस्थानच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.