Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू कोण पुसणार?

संततधार पाऊसाने सावली तालुक्यात 1500 हेक्टरवरील पिके पाण्याखाली तर १५७ घरांची पडझड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

पालकमंत्री,आमदार,खासदारांनी फिरविली पाठ

 आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावली तालुक्यातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत तर झालेच परंतु त्यात१५०० हेक्टरवरील पिकांचेही नुकसान झाले असून १५७ घरांची पडझड झालेले आहे.मात्र तरीही चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी अतिवृष्टीग्रस्त सावली तालुक्याला भेट देऊन पाहणी केली नाही.

राज्याचा बहुतांश भाग आणि पूर्व विदर्भात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूर,सखल भागात पाणी साचणे, भूस्खलन,पिकांचे नुकसान आणि घरांची पडझड मोठ्या प्रमाणात असून वैनगंगा नदीच्या काठावर वसलेला सावली तालुकाही त्याला अपवाद नाही. आठवडाभरापासून संततधार पाऊस पडल्याने सावली तालुक्यात पुराची परिस्थिती निर्माण झालेली असून सावलीशी जोडलेले 14 रस्ते या आठवड्यात अनेकवेळा खंडित झाले आहेत.आसोला मेंढा धरण ओसंडून वाहत आहे.वैनगंगा नदी,तिच्या उपनद्या,लहान नद्या,नाले,कालवे,गाव तलाव ओसंडून वाहत आहेत अनेक भागात पुराचे पाणी शेतात शिरले असून भात,कापूस,सोयाबीन आणि भाजीपाला इत्यादी १५०० हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अजूनही पाऊस पडत आहे.पूर अद्याप ओसरलेला नाही. शेतातील पिके अजूनही पाण्याखाली आहेत.

सततच्या पावसामुळे प्रशासन प्रत्येक शेतापर्यंत पोहोचू शकत नसल्याने नुकसानीचा अंदाज बांधता येत नाही.पाऊस थांबल्यानंतरच पंचनामे केले जातील.या मुसळधार पावसामुळे सावली तालुक्यात १५७ अधिक घरांची पडझड झाली आहे. बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले गेले असून त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या गेल्या आहेत.तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्कतेवर आहे.नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी पंचनामे करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे या तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत आणि डॉ.नामदेव किरसान हे या तालुक्याचे खासदार आहेत. तर सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शेतकऱ्यांची 1500 हेक्टरवरील पिके हातची गेली आहेत. या पावसामुळे शेकडो घरांची पडझड झाली आहे. बाधित लोकांना आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर सांत्वन आणि नुकसान भरपाईची गरज आहे. पालकमंत्री किंवा आमदार-खासदारांकडून संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण किंवा पंचनामे करण्याचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.

नुकसानग्रस्त शेतकरी स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसत आम्हा शेतकऱ्याचा वाली कोण? आमच्या नावाचा वापर फक्त निवडणुकी पुरताच का?अशी हाक देत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये