Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा येथील डायरिया मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करा

मालविय वार्ड वासियांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने 

वरोरा : नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे येथील मालविय वार्डातील चार वर्षीय बालक पूर्वेश सुभाष वांढरे याचा नुकताच डायरियाने मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेची गंभीर जबाबदारी नगर प्रशासनावर निश्चित करण्यासोबतच मृत मुलाच्या कुटुंबाला भरपाई मिळवून देण्यासाठीच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राहुल देवडे यांच्या नेतृत्वाखालील मालविय वार्डातील शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना देण्यात आले.

      निवेदनात शहरातील मालविय प्रभागातील स्मशानभूमी जवळील नालीच्या लगत असलेल्या नळाच्या पाण्याचा व व्हॉल लिक आहे. त्या ठिकाणच्या जागेची अनेक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आली नाही. आणि त्याच स्थितीत पाणीपुरवठा सुरू आहे. नालीचे घाण पाणी लिक व्हॉल मधूनच नळाद्वारे घरोघरी पुरवठा होत आहे. हे दुषित पाणी पिण्यात आल्याने मालविय वार्ड परिसरातील दोन, तीन कुटुंबांतील सदस्यांना डायरियाची लागण झाली. यात पूर्वेश वांढरे नामक चार वर्षीय मुलाचा नाहक बळी गेला. इतर बुडू वांढरे, प्रतिक्षा वांढरे, शोभा वांढरे, ओम बुरटकर, सौंदर्य बुरटकर आदींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

       शुद्ध पेयजल व स्वच्छता बाबत नगर परिषदेची कमालीची उदासीनता या संपूर्ण घटनेला कारणीभूत ठरत आहे. अनेकदा तक्रारी नंतरही त्याचे निराकरण होत नाही, ही शोकांतिका आहे.

       मृत मुलाचे पालक मिस्त्री काम करतात त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने या संपूर्ण घटनेची गंभीर जबाबदारी नगर प्रशासनावर निश्चित करण्या सोबतच मृत मुलाच्या कुटुंबाला नगर प्रशासना तर्फे आर्थिक सहाय्य अपेक्षित आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून शहरात सर्वच प्रभागात योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात यावे, इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.

   शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ता राहूल देवडे, सुभाष वांढरे, शामराव झाडे, अरूण सोयाम, रामदास बहादे, सुनिल झाडे,अनिल हिवरकर, राहूल मेश्राम, चेतन रेंगे आदींचा समावेश होता.

 नगर परिषदेचा प्रत्यक्ष कामा ऐवजी फक्त कामाचा दिखावा

    दुषित पाणी आणि खराब स्वच्छता याचा संबंध कॉलरा, अतिसार, आमांश, हिपॅटायटीस – ए, टायफॉइड आणि पोलिओ या सारख्या प्रसाराशी आहे. स्थानिक नगर परिषद, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागावर याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विशेषतः पावसाळ्यात यावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असते. नगर परिषद प्रत्यक्ष कामा ऐवजी फक्त कामाचा दिखावा करत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. मागील अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा योजना ठप्प आहे.

त्यात मागील दोन वर्षांपासून नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्याने नगर पालिका प्रशासक आणि टीमची एक प्रकारे लॉटरी लागली आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक, विरोधीपक्षनेते नसल्याने प्रशासनाची मनमानी सुरू आहे. त्याचा फटका सामान्य जनतेला सोसावा लागत आहे. प्रभागात डायरियाचे रुग्ण बघता घरोघरी जाऊन सर्वे करणे गरजेचे आहे. रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात यावे. डायरियाच्या नेमक्या कारणांची तपासणी करावी. यासाठी केवळ संशयित हॉटस्पॉटवरच नव्हे तर संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक आणि नियंत्रण उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

                  राहुल देवडे, सामाजिक कार्यकर्ता

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये