Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारा डॉक्टर हा देव माणूस – सुधाकर कडू

डॉक्टर्स डे, कृषी दिनानिमित्ताने डॉ. रॉय, वसंतराव नाईक यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा : डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे वैद्यकीय विश्वातील योगदान आज अनेक डॉक्टरांसाठी प्रेरणादायी आहे. कृषी क्षेत्रात वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती घडवून शेतकऱ्यांना संजीवनी दिली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा तर आरोग्य क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारा डॉक्टर हा देव माणूस आहे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवनाचे) विश्वस्त सुधाकर कडू यांनी येथे केले. महान चिकित्सक डॉ.बी. ही. रॉय, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आनंदवन मित्र मंडळ वरोरा, ओशनिक बहुउद्देशीय संस्था वरोरा, वरोरा- भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघ तथा उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांचे संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील ग्रीन शेड भवनात आयोजित ‘डॉक्टर्स डे’ व ‘कृषी दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे होते.

     मंचावर राष्ट्रीय सामाजिक न्याय कृति मंचाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मर्दाने, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील अधिसेविका वंदना बरडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

          कडू पुढे म्हणाले की, अन्नदाता शेतकरी आणि डॉक्टर्स आपल्या समाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयाने कात टाकल्याने आता कुष्ठरोग्यांसह विविध रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळत असल्याने रुग्णांचा शासकीय रुग्णालयाबद्दलचा विश्वास वाढला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी बाबा आमटे यांच्या कार्यावरही प्रकाश टाकत आनंदवन मित्र मंडळाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे प्रशंसोद् गार काढले.

     डॉ. मुधोळकर म्हणाले की, आयुष्यात लाखों लोकांचें जीवन वाचविण्यात डॉक्टरांचा मोलाचा वाटा आहे, म्हणूनच भारतात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो.

     अध्यक्षीय भाषणात डॉ. खुजे म्हणाले की, ‘ डॉक्टर्स डे ‘ दिनी आनंदवन मित्र मंडळाचा मिळालेला सहभाग हा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्याला मिळालेली पावती आहे. जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन आपण यापुढे अधिक क्षमतेने कार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

      मर्दाने म्हणाले की, कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले. भारतरत्न डॉ.बी.सी. रॉय यांनी रुग्णांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला. डॉ. रॉय हे म. गांधी यांचे खाजगी चिकित्सकसुद्धा होते. संयोगवश डॉ. राय यांचा जन्म व मृत्यू एकाच तारखेला झाला. कार्यक्रमात त्यांनी माजी मुख्यमंत्रीद्वय डॉ. बिधान चंद्र रॉय व वसंतराव नाईक यांच्या कार्याचे नेटके विवेचन केले.

       प्रास्ताविकात अधिसेविका बरडे म्हणाल्या की, कर्तव्यदक्षपणे आयुष्य जगणाऱ्या शेतकरी आणि वैद्यकीय चिकित्सकाचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीला नेहमीपासून राहीले आहे आणि सदैव राहील. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन आहे.

        कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. वंदेश शेंडे, अस्थी रोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण बुटोलिया, भौतिक उपचार तज्ज्ञ डॉ. वर्षा भुसे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. गेडाम, आयुर्वेदाचार्य डॉ. स्वाती पवार, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. स्नेहाली शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्येश जाधव तसेच कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे कृषी तज्ज्ञ सुधाकर कडू, शेतकरी राहुल देवडे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व रोपटे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच उपजिल्हा रुग्णालय परिसरात पारिजात, मधुमालती, चाफा, मोगरा, चमेली, कन्हेर आदी फुलझाडांचे रोपण करण्यात आले.

  कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बुटोलिया, डॉ. शेंडे, डॉ. पवार, डॉ. जाधव, डॉ. शिंदे, डॉ.गेडाम, परिसेविका रूबिना खान, अश्विनी बागडे, शीतल राठोड, इंदिरा कोडापे, सरस्वती कापटे, सुनंदा पुसनाके, अश्विनी बागडे, तुलसी कुमरे, विजया रुईकर, संगिता नकले, तनिष्का खडसाने, कुंदा मडावी, आरोग्य सहाय्यक सतिश येडे, वरिष्ठ लिपिक ओमकार मडावी, समुपदेशनक गोविंद कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बी. सी. रॉय व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले. यानिमित्ताने कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचेही स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सोनाली रासपाईले यांनी केले.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरोऱ्यातील आनंदवन मित्र मंडळ, ओशनिक बहुउद्देशीय संस्था, उपजिल्हा रुग्णालय व वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी राहुल देवडे, बंडू देऊळकर, संजय गांधी, प्रा. बी.आर. शेलवटकर, शाहीद अख्तर, विवेक बर्वे, प्रवीण गंधारे, नाना नेरकर, शरद नन्नावरे, ओकेंश्वर टिपले, भारत पातालबंसी, विजय वैद्य, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वृंद लक्ष्मीकांत टाले, बंडू पेटकर, अमोल भोंग, विजय उईके, देव जुलमे, सागर कापटे, समीर किन्नाके, शरद घोटकर इ.नी भरीव योगदान दिले.

     कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी, स्वंयसेवी संस्थांचे पदाधिकारी, महिला व सजग नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये