ताज्या घडामोडी

जुन्या मैत्रीला जोडण्यात समाज माध्यमांचा वाटा मोलाचा

आजच्या शिक्षकांनी पुन्हा अनुभवले आपले महाविद्यालयीन जीवन

व्हॉट्स ॲप चा शोध म्हणजे संवादासाठी जणू वरदानच म्हणता येईल! पूर्वी कॉलेजमध्ये शिकलेले फार कमी विद्यार्थी भविष्यात सोबत असायचे, त्यांच्यात संवाद देखिल क्वचित प्रसंगी व्हायचा मात्र व्हॉट्स ॲपच्या शोधा नंतर यात क्रांतिकारी बदल झाला. प्रत्येकाच्या सोयीनुसार संवाद ग्रुप तयार झालेत. असाच आमचाही डी. एड्. चे प्रशिक्षण घेतानाच्या सर्वांचा एक गृप तयार झाला. सुरुवातीला नंबर मिळवणे कठीण गेले. पण सर्वजण मिळालेच. जनता अध्यापक डी. एड्. महाविद्यालयाचे नावच गृपला दिले. गृपमध्ये शैक्षणिक चर्चा, संवाद, वाढदिवस, परिपत्रक, माहिती, कला, कलागुण या सर्वं गोष्टींचे आदानप्रदान होऊ लागले. कुणाला कुठली समस्या असली तर गृपचे सदस्य ते सोडविण्यास तयार असायचे. गृप मध्ये एकमेकांच्या सानिध्यात असल्याने आपुलकीचे नाते पुढे पुढे दृढ होत गेले. याचेच पर्यावसान पुढे स्नेहमिलनाच्या संकल्पनेत, कार्यक्रमात झाले रणजित पाजनकर यांच्या संकल्पनेतून स्नेहमिलनासाठी गृपमध्ये कल्पना तयार झाली. त्यांच्या संकल्पनेला सोबत करत रजनी मत्ते, प्रवीण कांबळे, अरुण बावणे, स्मिता प्रतापवार या चंद्रपूरवासियांनी कार्यक्रमाची सुंदरशी रूपरेषा आखली आणि त्यांच्या पुढाकाराने चंद्रपूर हे स्नेहमिलनाचे ठिकाण पक्के झाले. हो…नाही म्हणत म्हणत सर्वजण शेवटी तयार झालेत व एकत्रीकरणाचा कार्यक्रम ठरला या दिवसाची चातकाप्रमाणे वाट पाहत.

चंद्रपूर ची विशेषता असलेल्या ताडोबा परीसरातील महाराणा रिसॉर्ट, रमणीय स्थळ, रम्य परिसर, उन्हाळ्याची चाहूल लागू न देता गारवा प्रदान करणारे ठिकाण येथे ठरल्याप्रमाणे सर्वजण एकत्रित आले. स्वागत पेय, नाश्ता, वाढदिवस, व मैत्रीचा केक कट करून सर्वांच्या कौटुंबिक परिचयाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. परिचय देतांना प्रत्येक जण भावूक होतांना जाणवले. एवढ्या दिवसानंतर किती बोलू किती नाही असे सर्वांना झाले होते. कुणाला स्वतः चा उत्कर्ष व प्रगतीचा आलेख सांगताना खूप आनंद होत होता, आणि एखादी दुःखद प्रसंग ओवतांना एखादी मैत्रीण भावूक होऊन तिचे अश्रूही ओघळत होते. परीचयातून सुखदुःखाच्या गोष्टी, प्रगती, उत्कर्ष आलेख याचा लेखाजोखा मांडतांना तहान भूक नक्की हरवली होती. काहींनी डि. एड. च्या जुन्या आठवणी जाग्या करून दिल्या आणि त्यावेळचे प्रसंग जिवंत केले. जणू भूतकाळात गेल्याचा भास होत होता. पण सर्वाच्या मनोगतातून हे जाणवले की सर्वजण या क्षेत्रात खूप परिश्रम करीत आहेत आणि प्रगती पथावर आहेत. खरोखर मला हा खूप अभिमानाचा क्षण वाटला. सर्वांची मुले चांगली उच्च शिक्षण घेत आहेत. काहींची नोकरीला लागली खरोखरच कौतुकास्पद होतं हे सर्व! पुढे जेवनाचा आस्वाद व फोटोजेनीक ठिकाणी फोटो घेऊन क्षणाचा आस्वाद आम्ही घेतला.

नंतर संगीत खुर्ची व रिंग गेममध्ये पुन्हा एकदा लहान होऊन विद्यार्थी दशेत गेल्याचा भास होत होता. एकमेकांची मजा उडवत मोबाईल कॅमेऱ्यात क्षण कैद होत होते. सर्वत्र आनंदी आनंद. नंतर बक्षीस वितरण, सत्कारासोबत, गीतांचा आनंद घेण्यात आला.

कार्यक्रम चंद्रपूरात असल्याने चंद्रपूरकरांनी इतरांसाठी घेतलेली मेहनत स्पष्ट जाणवत होती. यात प्रामुख्याने प्रवीण कांबळे, रजनी मत्ते, अरूण बावणे, स्मिता प्रतापवार यांचा मोलाचा वाटा होता. असा हा अविस्मरणीय स्नेहमिलन सोहळा आठवणींच्या कप्प्यात सदैव सुगंध पेरत राहील यात तिळमात्र शंका नाही.

शब्दांकन
आरती पद्मावार

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये