Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टॉवर आहेत नावाला रेंज नाही गावाला!

सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क व्यवस्थित नसल्याने मोबाईल धारकांना नाहक त्रास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात मोबाईल नेटवर्किंगमुळे जग अधिकच जवळ आले आहे. ऑनलाईनच्या जमान्यात मोबाईल चैनीची वस्तू राहिली नसून अत्यावश्यक गरज बनली असतांना मागील पंधरा दिवसापासून जिवती येथील सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी नागरिक आपला मोबाईल नंबर पोर्ट करत आहेत. परंतु ज्या कंपनीकडे नंबर पोर्ट करतात. त्या देखील मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक व्यापारी व शाळकरी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. संबंधित मोबाईल कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी जिवतीतील मोबाईल ग्राहक करत आहेत.

जिवती येथे आयडिया मोबाईल नेटवर्क मनोऱ्यावर जियो, ओडाफोनच्या छत्र्या आहेत. तर बीएसएनएलने आपले स्वतंत्र टावर उभारलेले आहे. आयडिया  मोबाईल नेटवर्किंग थोडीफार ठीक आहे. परंतु बीएसएनएलने व जिओने तर जणू इतर मोबाईल कंपन्यांकडून चिरीमिरीचे संबंध प्रस्थापित केले की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे. पूर्वी जिओची उत्कृष्ट मोबाईल सेवा मिळत असल्याने व चांगली इंटरनेट सर्व्हिस मिळत असल्याने अधिकांश लोकांनी जिओचे नवीन सिमकार्ड घेतले तर काहींनी आपले आयडिया, ओडाफोन, बीएसएनएलचे नंबर जिओमध्ये परिवर्तित करून घेतले. परंतु मागील पंधरा दिवसापासून जिओने ग्राहकांचे वांधे करून ठेवले आहे. मोबाईल ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी या हेतूने ठीक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले.

गडगंज पगारी वर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु हे अधिकारी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्यातरी मोबाईल टॉवर्स शोभेची वस्तू बनले आहे. ग्राहकांची तक्रार किंवा फोनवर सूचना दिली तर त्यांची साधी दखलही घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. आज घडीला मोबाईल कंपन्यांच्या भरोशावर स्थानिक बँक, गव्हर्मेंट कार्यालये व हजारोच्या संख्येत असलेले मोबाईल धारक अवलंबून आहेत. परंतु याच मोबाईल कंपन्याकडून नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक वेळा बँकांमधील व्यवहाराचा खोळंबा निर्माण होत आहे.

याबाबत संबंधित मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना अत्यावश्यक व व्यवस्थित सुविधा मिळावी यासाठी तातडीने उपाय योजना करुन बीएसएनएल सहित इतर सर्वच मोबाइल कंपन्यांनी जिवतीसह तालुक्यातील सर्वच मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क अविरत मिळेल अशी सेवा देण्याची आग्रही मागणी केली जात आहे.संपर्क यंत्रणा वारंवार खंडित होत असल्याने जिवतीचे मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये