हंसराज अहीर यांनी सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : इराण-अमेरिका-इस्राईल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने भारतातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या आयातीवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन आणि गॅसचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी त्वरित प्रतिसाद देत आपल्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हंसराज अहीर यांनी आज एका निवेदनात म्हटले आहे की, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी दिलेल्या आवाहनाला प्रत्येक नागरिकाने प्रतिसाद द्यायला हवा. इंधन बचतीचा हा छोटासा प्रयत्न देशाच्या हितासाठी आहे. त्यामुळे मी माझ्या सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट वाहन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गरजेनुसारच वाहनांचा वापर करू.”
सध्या इराण-इस्राईल- अमेरिका यांच्यातील तणावामुळे होर्मूझची सामुद्रधुनी आणि इतर प्रमुख मार्गांवर वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या आयातदार देशाला कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचा आणि पुरवठा कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीत इंधन बचत हा एकमेव प्रभावी उपाय असल्याचे सरकारचे मत आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी नुकत्याच केलेल्या आवाहनात जनतेला सार्वजनिक वाहतूक, कार풲िंग, अनावश्यक प्रवास टाळणे आणि घरगुती गॅसचा वापर जाणीवपूर्वक कमी करण्याचे आवाहन केले होते. हंसराज अहीर यांचा हा निर्णय या आवाहनाला मिळालेला पहिला ठळक प्रतिसाद मानला जात आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इतर अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी देखील या दिशेने पावले उचलण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार इंधन बचतीसाठी जनजागृती मोहीम आणखी तीव्र करण्याच्या विचारात आहे.



