ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रासेयो पथकाची मतदार जनजागृती मोहीम प्रशंसनीय – डाॅ. ढाले

मतदार दिना'निमित्त विविध उपक्रम संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश असून धर्मनिरपेक्ष आहे. लोकांचे कल्याण, देशाची सुरक्षा व समृद्धी हे ध्येय साकारायचे असेल तर योग्य व सक्षम नेतृत्व देणाऱ्या व्यक्तीला निवडून देणे आपले कर्तव्य आहे व याकरीता जनजागृती करणे आवश्यक असून या दृष्टिकोनातून विविध उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना पथकाची मतदार जनजागृती मोहीम प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील रासेयो पथकाच्या ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले यांनी 25 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय रासेयो कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, वरीष्ठ महाविद्यालय रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मोहदरे व प्रा. डाॅ. रफीक शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मतदार जनजागृतीपर मिरवणुकीने झाली. ‘मतदाता जागे व्हा’, ‘आपले मत, आपले कर्तव्य’, ‘योग्य मत, सक्षम लोक प्रतिनिधी’ अशा घोषणा देऊन रॅली संपन्न झाली.

या दिना’निमित्त ‘मी जबाबदार मतदाता’ या विषयावर ‘पोस्टर्स मेकिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन यात सत्तेश्वरी सावरकर हिने प्रथम तर वैष्णवी कन्नाके व अश्विनी परचाके यांनी द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त केले.

यावेळी ‘जागृत मतदाराची शपथ’ देण्यात आली. कु.रूचिका काबंळे, कोमल शितळे व सुप्रिया यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी तर प्रा संतोष मोहदरे व प्रा. रफीक शेख यांनी मतदार दिनाचे महत्व सांगितले.

संचालन सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीश यावले यांनी तर आभार प्रा. सुनिल राठी यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये