ताज्या घडामोडी

पक्षांतर्गत सुंदोपसंदी वाढविणार मुनगंटीवारांच्या अडचणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदार संघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असुन 2019 च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला एकमेव विजय मिळवुन देणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात यावेळी भाजपा व काँग्रेस पक्षात काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र मतदानाला आठावड शिल्लक असताना दिसत आहे.

2019 मधे ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश करून आ. सुरेश उर्फ बाळू धानोरकर ह्यांनी भाजपचे दिग्गज नेते, मागील तीन वेळचे विजयी उमेदवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री पदावर आसिन असलेले हंसराज अहिर ह्यांना अनपेक्षितपणे धुळ चारून विजयश्री प्राप्त केली एव्हढेच नव्हे तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची धुळधाण होत असताना बाळु धानोरकर ह्यांनी विजय प्राप्त करून पक्षाची लाज राखली होती. मात्र त्यांच्या अनपेक्षित मृत्यूने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसमध्ये जणु एक पोकळी निर्माण झाली होती. दुसरीकडे हंसराज अहिर ह्यांच्या पराभवाला जिल्ह्यातील एका वजनदार नेत्याची निवडणुकीतील निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोप मागील पाच वर्षात वारंवार होत आहे.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राज्याचे मंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांच्यावर हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याची मोठी जबाबदारी सोपविली. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ख्याती असलेल्या भाजपात ह्या निर्णयाचे कुठेही नकारात्मक पडसाद जाहीररीत्या उमटले नसल्याने पक्षाने तसेच सुधिर मुनगंटीवार ह्यांनी सुटकेचा विश्वास सोडला होता. दुसरीकडे काँग्रेस पक्षात तिकिटावरून मोठा गदारोळ उडाला, स्व. खा. बाळु धानोरकर ह्यांच्या पत्नी आ. प्रतिभा धानोरकर ह्यांनी लोकसभा क्षेत्रावर आपला नैसर्गिक हक्क असल्याचे सांगुन उमेदवारीवर दावा ठोकला तर दुसरीकडे युवा नेतृत्वाच्या नावाने विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार ह्यांनी थेट दिल्ली गाठत चुरस निर्माण केली. अखेरीस पक्षाने प्रतिभा धानोरकर ह्यांना उमेदवारी जाहिर करून मतदार संघातील निवडणूक रंगतदार केली.

दुसरीकडे भाजपचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार ह्यांनी उमेदवारी मिळवताच प्रचाराचा धडाका सुरू केला. उमेदवारी अर्ज सादर करताना जिल्ह्यातील जेष्ठ नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर प्रचारासाठी राजुरा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले ह्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची जंगी जाहीर सभा आयोजित करून वातावरण निर्मिती केली. जेष्ठ नेत्यांच्या सभा कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करत असतात त्याचप्रमाणे ह्या सभांचा सामान्य मतदारांवरही प्रभाव पडत असतो मात्र तरीही स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी शेवटचे मत नोंदविले जात पर्यंत एकनिष्ठेने पक्षाचे व पर्यायाने उमेदवाराचे काम करणे अपेक्षित असते.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ह्याबाबतीत सुधिर मुनगंटीवार ह्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र असुन पक्षाचे जुने मातब्बर नेते प्रचारकार्यात हव्या त्या प्रमाणात सक्रिय नसल्याचे सामान्य मतदारांना दिसुन येत आहे. राजुरा येथिल नितीन गडकरींच्या सभेला माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ह्यांची अनुपस्थिती मतदारांच्या नजरेत भरणारी होती. समाज माध्यमांवर देखिल ह्या अनुपस्थितीची खमंग चर्चा रंगली. नितीन गडकरी ह्यांच्या सभेची म्हणाव्या त्या प्रमाणात न झालेली प्रसिद्धी, उन्हाचा प्रचंड तडाखा व नेत्यांची उदासीनता ह्यामुळे सभेला अपेक्षित गर्दी झाली नाही स्वाभाविकपणे ह्याचा नकारात्मक परिणाम मतदारांवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे मोदींच्या सभेतही हंसराज अहिर ह्यांनी बऱ्याच उशिरा उपस्थिती लावली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंचावर असूनही हंसराज अहिर सभास्थळी पोहचले नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. उशिराने का होईना ते सभेला आले मात्र त्यांनी मंचावरून कोणतेही संबोधन केले नाही अथवा मतदारांना कुठलेही आवाहन देखिल केले नाही त्यामुळे हंसराज अहिरांची नेमकी भुमिका काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

पक्षातील सुंदोपसंदी एवढ्यावरच थांबत नसुन भाजपचे विविध ठिकाणचे जेष्ठ नेतेही प्रचारात अलिप्त असल्याचे चित्र आहे. बाहेरील व्यक्ती आपल्या क्षेत्रात येऊन कार्य करतो आणि त्याला सुधिर मुनगंटीवारांच्या वरदहस्त असल्यामुळे आपल्या स्थानाला धोका असल्याची भावना ठेऊन बरेच नेते तसेच त्यांना मानणारे कार्यकर्ते स्वतःहून प्रत्यक्ष प्रचारात झोकुन कार्य करत असल्याचे दिसत नसुन राष्ट्रीय नेत्यांच्या सभेला नाईलाजाने उपस्थिती दर्शवित असल्याचे भासत आहे. विविध विधानसभा मतदारसंघात हे नेते पक्षाचे आधार असावयास हवे मात्र वैयक्तिक राजकारणातून तठस्थता धारण केलेल्या ह्या नेत्यांमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे भान नेत्यांना नसल्याचे आढळुन येते. स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे भाजपचे मिशन 370 व राज्यातील 45 पार चे उद्दिष्ट साकार होणार का ह्याचा विचार नेत्यांसह पक्षाने करणे क्रमप्राप्त आहे.
आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांची निष्क्रियता सुधिर मुनगंटीवार ह्यांना अडचणीची ठरणार का असा प्रश्न विचारला जात असुन ह्यासंदर्भात मुनगंटीवारांनी ह्या नेत्यांची नाराजी दुर न केल्यास पक्षातील सुंदोपसंदी त्यांना अडचणीची ठरेल हे मात्र नक्की.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये