ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर – जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लक्ष ३६ हजार ३१४ मतदार : ८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांना घरून मतदानाची सोय ; नियंत्रण कक्ष व विविध संपर्क क्रमांक कार्यान्वित

चांदा ब्लास्ट

केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १३ – चंद्रपूर लोकसभा  मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडी जी.सी. यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात मतदार जनजागृतीकरीता स्वीप योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जिल्हा प्रशासनातर्फे सायकल रॅली, मिनी मॅरेथॉन व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यापुढेही जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा, यावर जनजागृती करण्यात येईल. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते, तेथे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आदर्श आचार संहिता व निवडणूक खर्च पथकांची स्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण ४२ फिरते निगराणी पथक (एफ.एस.टी.), ६२ स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.), २९ व्हिडीओ निगराणी पथक (व्ही.व्ही.टी.), ९ व्हीडीओ पाहणी पथक (व्ही.एस.टी.) ६ खर्च पथक आणि ६ खर्च सनियंत्रक पथक स्थापन करण्यात आले आल्याचे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण १८ लक्ष ३६ हजार ३१४ मतदार : 

१३ – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून एकूण १८ लक्ष ३६ हजार ३१४ मतदार आहेत. यात ९ लक्ष ४५ हजार २६ पुरुष मतदार, ८ लक्ष ९१ हजार २४० स्त्री मतदार आणि इतर ४८ जणांचा समावेश आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ३६ हजार ३८८ पुरुष मतदार, १ लक्ष ३४ हजार ८४० स्त्री मतदार असे एकूण २ लक्ष ७१ हजार २२८ मतदार आहेत. तर चिमूर विधानसभा मतदार संघात १ लक्ष ४० हजार १९७ पुरुष मतदार, १ लक्ष ३६ हजार ६२७ स्त्री मतदार असे एकूण २ लक्ष ७६ हजार ८२४ मतदार आहेत. तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १८ ते १९ वयोगटात एकूण २४१२० मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या २०४४ असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघात २११८ मतदान केंद्र आहेत.

८५ व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार व दिव्यांग मतदार :

१३ – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ८५ व त्यापेक्षा जास्त वय असलेले ७११७ पुरुष मतदार आणि ९५०४ स्त्री मतदार असे एकूण १६६२१ मतदार आहेत. तसेच गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात ८५ व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या २४०३ तर चिमूर विधानसभा मतदार संघात हा आकडा २५९४ आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण ९६७९ दिव्यांग मतदार आहेत. यात ६१६४ पुरुष दिव्यांग तर ३५१५ स्त्री दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ८५ व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच ४०  टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारास गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारास १२ डी नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

नियंत्रण कक्ष व विविध संपर्क क्रमांक : 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक– २०२४ करीता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१७२ – २७१६१७ आहे. सोशल मिडीया नियंत्रण व तक्रारीकरीता पोलिस विभागातर्फे ८८८८५११९११ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून २४ बाय ७ कार्यरत राहणार आहे. याशविाय जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रार निवारण / मदत कक्ष, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तक्रार निवारण / मदत कक्षाचा टोल फ्री क्रमांक १९५० असून आदर्श आचार संहिता कक्षाचा क्रमांक ८७८८५१००६१ आहे. तसेच सी-व्हिजील / ई.एस.एम.एस. या ॲप वरही तक्रार नोंदविता येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये