भद्रावती ते पिपरी (देश.) घुग्घुस मार्गावर एस.टी. बस सेवा सुरु करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती ते पिपरी देशमुख – मुरसा – घुग्घुस या मार्गावर एस.टी. महामंडळाची बस सेवा सुरु करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या मार्गावर नियमित बससेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना, कामगारांना व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पिपरी देशमुख हे गाव भद्रावती तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असून, परिसरात अनेक लहानमोठी गावे आहेत. येथील नागरिकांचा भद्रावती शहराशी दैनंदिन संपर्क असतो. शिक्षण, आरोग्य सेवा, नोकरी व दैनंदिन व्यवहारासाठी भद्रावती तसेच घुग्घुसला जाणे आवश्यक असते. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे लोकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते, जे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.
विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजसाठी वेळेवर पोहोचणे कठीण होत आहे. महिलांसाठीही ही परिस्थिती त्रासदायक ठरत आहे. अनेक वेळा रुग्णवाहिकेची सोय नसल्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळवणे कठीण जाते.
युवाशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दिलीप मत्ते तसेच सचिव निश्चीत सुभाष एकरे यांनी आमदार करण देवतळे यांची भेट घेत बससेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले आहे.
या मार्गावर बससेवा सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. महामंडळाने ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर ही सेवा सुरु करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.