ताज्या घडामोडी

जागतिक व्याघ्र दिनाच्या दिवशीच वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

वाघ वाचवा मोहीम फक्त कागदावरच का? राजू झोडे यांचा सवाल

चांदा ब्लास्ट

आज जागतिक व्याघ्र दिन. 29 जुलै ला हा दिवस मोठ्या उत्साहात भारतात व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र चंद्रपूर जिल्हा याला अपवाद ठरला. आज शनिवारी बल्लारपूर तालुक्यातील गोंडपीपरी-बल्लारपूर मार्गावर असलेल्या कळमना जवळ एक वाघाला जड वाहतूक करणाऱ्या ट्रकने उडविले. यात वाघाचा मृत्यू झाला. जागतिक व्याघ्र दिनाच्या दिवशीच ते ही वनमंत्री यांच्या जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात वाघाचा मृत्यू झाल्यानं वाघ वाचवा मोहीम फक्त कागदावरच उतरविणार की त्याची अंमलबजावणी करणार असा प्रश्न उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी उपस्थित केला आहे.

दरवर्षी 29 जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे.अशातच बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावाजवळ ट्रकने वाघाला धडक दिली.यात वाघाचा मृत्यू झाला.या मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असून वनविभाग,आरटीओ, पोलीस प्रशासनाने अजूनही यावर आळा घातला नाही.तसेच हा मार्ग घनदाट जंगलाचा असून बल्लारपूर पासून ते गोंडपीपरी पर्यन्त प्रशासनाने रस्ते अपघात रोखण्यासाठी किंवा वन्यप्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी कोणतेही ठोस उपाययोजना केल्या नाहीत.त्यामुळं भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे वाघाला आपला जीव गमवावा लागला.

एकीकडे जागतिक व्याघ्र दिन साजरा होत असताना वाघाचा मृत्यू होणे ही दुर्दैवी घटना आहे.त्यामुळं वनमंत्री, पोलीस प्रशासन, वनविभाग आता तरी या मार्गावर जड वाहतुकीस आळा घालेल का? या मार्गावर गतिरोधक बसविणार का? वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या घटनेची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी उपस्थित केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये