विश्वशांती विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम पुरस्कार प्राप्त विश्वशांती विद्यालय सावली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती चंद्रपूर, सावली तालुका विधी सेवा समिती तथा विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर जाधव, सहाय्यक शिक्षक किशोर संगीडवार,डॉ.शेखर प्यारमवार उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड.धनंजय आंबटकर,ॲड.पी.पी.शेंडे, डॉ.षडाकांत कवठे,विधि स्वयंसेवक जिल्हा प्राधिकरण समिती,चंद्रपूर हे होते. त्यावेळी ॲड.धनंजय आंबेडकर यांनी कायद्याचे शिक्षण शालेय स्तरावर देण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान प्राप्त होईल आणि विधी शाखेतील शिक्षणाला महत्त्व प्राप्त होईल असे मत व्यक्त केले. तसेच ॲड.शेंडे यांनी कायदे,नियम कायदेशीर प्रक्रियेतील विविध बाबींवर प्रकाश टाकला.डॉ. कवठे यांनी वर्तमान परिस्थितीत बालविवाह व लैंगिक शोषण या प्रमुख समस्येवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक धनंजय गुरनुले तर आभार सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांचे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.