कष्टकरी महिलांच्या सन्मानासाठी अमर बोडलावार यांचा पुढाकार
गोंडपिपरीत शेतकरी महिला प्रमाणपत्राचा निःशुल्क कार्यक्रम.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी – शेतीच्या बांधावर घाम गाळणाऱ्या महिलांच्या कष्टांना आता अधिकृत ओळखीची जोड मिळणार आहे. ग्रामीण महिलांच्या श्रमाला सन्मान, त्यांच्या कृषी योगदानाला मान्यता आणि समाजात स्वतंत्र ओळख मिळावी, या उद्देशाने माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी शेतकरी महिलांसाठी मोफत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा सामाजिक उपक्रम गोंडपिपरी तालुक्यात हाती घेतला आहे.
ग्रामीण भागातील महिला शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुषांच्या बरोबरीने योगदान देतात. पेरणीपासून कापणीपर्यंत तसेच शेतीपूरक कामांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. मात्र त्यांच्या या योगदानाची स्वतंत्र नोंद अनेकदा कागदोपत्री होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन बोडलावार यांनी शेतकरी महिलांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत पात्र महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केवळ प्रमाणपत्र देणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, शेतीत प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांच्या श्रमाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध पातळ्यांवर उपक्रम राबविणाऱ्या बोडलावार यांच्या या पुढाकारामुळे ग्रामीण महिलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
स्वतःच्या कष्टातून कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत हातभार लावणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाची स्वतंत्र ओळख मिळणे ही या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण बाजू आहे. या प्रमाणपत्राबाबत अधिक माहितीसाठी अमर बोडलावार जनसंपर्क कार्यालय, गोंडपिपरी येथे संपर्क साधावा. पात्र शेतकरी महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन बोडलावार यांनी केले आहे.



