ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये १७ ऑक्टोबरला ‘दादाचा दांडिया-२०२६’; गरबा स्पर्धेत आकर्षक बक्षिसांची मेजवानी!

महिला व युवती गटांतील विजेत्यांना फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एलईडी टीव्ही; लकी ड्रॉमध्ये पैठणीसह विविध भेटवस्तू जिंकण्याची संधी

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला आणखी रंगत आणण्यासाठी घुग्घुस येथील प्रयास सभागृहात ‘दादाचा दांडिया-२०२६’ अंतर्गत भव्य गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, महिला आणि युवतींना आपल्या नृत्यकौशल्याचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते होणार आहे. नगरसेवक विवेक बोढे हे कार्यक्रमाचे मार्गदर्शक, तर विद्या पाल या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून घुग्घुसचे ठाणेदार प्रकाश राऊत, खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका जेसी रॉय, मुख्याध्यापिका क्किना फर्नांडो, शिक्षिका उल्का पित्रे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री अमोल थेरे आणि नगरसेवक निरीक्षण तांड्रा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महिला व युवती गटांसाठी आकर्षक पारितोषिके

या गरबा नृत्य स्पर्धेत महिला गट आणि युवती गट अशा दोन स्वतंत्र गटांसाठी आकर्षक पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही गटांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रेफ्रिजरेटर आणि आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना वॉशिंग मशीन आणि ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना एलईडी टीव्ही आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर आकर्षक पारितोषिकेही प्रदान केली जाणार आहेत.

लकी ड्रॉमध्ये पैठणीसह अनेक भेटवस्तू

कार्यक्रमात लकी ड्रॉ हेही प्रमुख आकर्षण असणार आहे. या लकी ड्रॉमध्ये दोन पैठणी साड्या, एक मिक्सर, एक मोबाईल, १० गिफ्ट सेट, १० हॉटपॉट आणि १० टिफिन अशा विविध भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे.

सांस्कृतिक उत्साहाला मिळणार रंगत

गरबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक पारितोषिकांची मेजवानी यामुळे ‘दादाचा दांडिया-२०२६’ हा सोहळा रंगतदार ठरण्याची अपेक्षा आहे. महिला व युवतींच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे घुग्घुस परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन सांस्कृतिक उत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये