डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
ग्रामस्वच्छता ही सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली - बंडोपंत बोढेकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित डॉ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर येथून जवळच असलेल्या सिदूर गावात सुरू आहे. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ‘स्वच्छ भारत अभियानात युवकांची भूमिका’ या विषयांवर ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आणि डॉ. श्रावण बाणासुरे (बल्लारपूर) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल लभाणे होते. तर डॉ. किशोर महाजन यांची उपस्थिती होती.
यावेळी बंडोपंत बोढेकर म्हणाले की, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जनमानसांत ग्रामस्वच्छतेचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा तसेच ग्राम सुधारणेचा विचार प्रभावीपणे रूजविला. त्यामुळे आपण जीवन जगत असताना वैयक्तिक स्वच्छता आणि ग्रामस्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत. ग्रामस्वच्छता ही सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आपल्या कामाची गुणवत्ता वाढते आणि पर्यावरण पूरक जीवनशैली निर्माण होत असते, असे बंडोपंत बोढेकर म्हणाले. तर डॉ. प्रा. बानासुरे म्हणाले की, युवकांमध्ये काही तरी नवे करण्याची जिद्द असते. त्यामुळे स्वच्छतेची संस्कृती रूजवण्यासठी युवकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. डॉ. लभाने यांनीही शिबिरात होणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यक्रमाबाबत माहिती देऊन ग्रामस्वच्छतेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.किशोर महाजन यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लुकेश चलाख यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. काजल चुनारकर यांनी केले.



