पालिकेच्या नळातून नागरिकांना मिळाले चक्क गटाराचे पाणी
अमृत योजनेचे नाव विषाक्त योजना ठेवण्याची आली वेळ
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
शहरातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी पुरविणे ही संबंधित शहराच्या पालिकेची तसेच ग्राम पंचायत क्षेत्रात पंचायतीची जबाबदारी असते मात्र बऱ्याचदा नागरिकांना पेयजलाची समस्या भेडसावत असते तर बऱ्याचदा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा देखिल होत असतो.
असाच प्रकार आज चंद्रपूर शहरातील तुकुम भागातील गुरुद्वाऱ्याच्या समोरील भागात नागरिकांवर ओढवला. प्राप्त माहितीनुसार सकाळी नित्यनेमाने नळ येण्याच्या वेळेस नागरिकांनी आपल्या घरातील आदल्या दिवशीचे पेयजल रिकामे करून पाण्याची भांडी ताजे शुध्द पाणी घेण्यास स्वच्छ करून घेतले. मात्र आज नळातून चक्क गटाराचे दुर्गंधीयुक्त, दुषित पाणी येणे सुरू होताच एकच हलकल्लोळ माजला. परिसरातील नागरिकांनी शेजारी पाजारी तसेच आजूबाजूच्या ओळीतील गृहिणींना फोन करून खताजमा करून घेतली असता संपूर्ण भागात गटाराचे पाणी नळातून येत असल्याची माहिती मिळाली.
काही सुज्ञ नागरिकांनी गटाराचे पाणी नळातून येण्याचे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की पेयजल पुरवठा पाईप लाईन गटाराच्या नालीतून टाकण्यात आल्याचे लक्षात आले. ही पाईप लाईन एका ठिकाणी फुटल्यामुळे गटारातील दुषित पाणी नळाच्या पाईप मधे शिरल्याने नागरिकांच्या घरात पिण्याच्या पाण्याऐवजी चक्क गटाराचे पाणी येत होते.
चंद्रपूर महापालिकेने नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देण्याच्या नावाने शहरात अमृत योजना लागु केली. ह्या योजनेचे काम खाजगी कंत्राटदारास देण्यात आले. योजनेच्या पूर्ततेसाठी शहरातील कित्येक रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच नळाची पाईप लाईन चक्क नाली व गटारातून टाकण्यात आल्याने गुरुद्वारा परिसरातील नागरिकांना अमृत योजनेने जणु विषाचा पुरवठा केल्याचे चित्र दिसुन आले. ह्या संदर्भात महापालिका प्रशासन काय कारवाई करते ह्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.