भ्रामक जाहिरातींपासून सावध राहा
घुग्घुस पोलीस ठाण्याचा नागरिकांना संदेश

चांदा ब्लास्ट
सोशल मीडियाच्या माध्यमातून घुग्घुस पोलीस ठाण्याचे एपीआय योगेश पाटील यांनी आज नागरिकांना जागरूकतेचा संदेश दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी आवाहन केले आहे की इंटरनेटवर दिसणाऱ्या “₹८०० रोज कमवा” किंवा अशाच प्रकारच्या आकर्षक दाव्यांच्या जाहिरातींपासून सावध राहा. या पैकी बहुतांश जाहिराती खोट्या व भ्रामक असून त्यांचा उद्देश साध्या-भोळ्या लोकांना फसवणे हा असतो.
भ्रामक जाहिराती कशा ओळखाल?
अवास्तविक दावे: कसलाही परिश्रम किंवा कौशल्याशिवाय मोठ्या कमाईचे वचन.
लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न: “तुरंत श्रीमंत व्हा” असे घोषवाक्य.
आधी पैसे भरण्याची अट: रजिस्ट्रेशन, ट्रेनिंग किंवा इतर कोणत्याही शुल्काच्या नावखाली पैसे मागणे.
अस्पष्ट काम: खरे काम काय आहे याची स्पष्ट माहिती न देणे.
स्वतःला वाचवण्यासाठी उपाय:
संशय ठेवा: कसलाही परिश्रम न करता सतत कमाई होऊ शकत नाही.
रिसर्च करा: कंपनी/वेबसाईटचे नाव गुगलवर शोधा आणि त्याचे रिव्ह्यू व तक्रारी तपासा.
व्यक्तिगत माहिती देऊ नका: बँक डिटेल्स, ओटीपी, आधार, पॅन इ. माहिती शेअर करू नका.
रिपोर्ट करा: अशा जाहिराती लगेच गुगल, फेसबुक, युव्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा.
आधी पैसे देऊ नका: कोणत्याही नोकरीसाठी किंवा कामासाठी आगाऊ पैसे भरणे टाळा.
एपीआय पाटील यांनी सांगितले की, “एखादी गोष्ट खरी असण्याइतकी चांगली वाटत असेल, तर ती कदाचित खरी नसते.” त्यांनी नागरिकांना आवाहन केले की स्वतः सावध राहा आणि इतरांनाही अशा खोट्या दाव्यांपासून वाचण्यासाठी जागरूक करा.