ताज्या घडामोडी

चंद्रपूरला पुराचा वेढा घरांमधे शिरले पाणी – पठाणपुरा स्मशानभूमी पाण्याखाली

अनेक भागातील नागरिकांचे स्थलांतरण सुरू

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पुर आला असुन जिल्हा मुख्यालय असलेल्या चंद्रपूर शहरात देखिल पाऊस व पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांची दैना उडाली आहे तर प्रशासन शहरातील काही भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रयत्नात आहे.

चंद्रपूर शहर हे मुख्यत्वे किल्ल्याच्या आतील बाजूस वसले आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूला पठाणपुरा भाग असुन तिकडच्या प्रवेशद्वाराजवळुन झरपट नदी आहे. थोड्या अंतरावरून वर्धा नदी वाहते. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने पाणी सखल भागात शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली असुन शहराचा आरवट व इतर गावांशी संपर्क खंडित झाला आहे. ह्या परिसरात असलेल्या स्मशानभूमीत पाणी शिरले असुन त्या ठिकाणी जवळपास चार फुटांपर्यंत पाणी साचले असल्याने अंत्यसंस्कार करणे अशक्य झाले आहे.

शहरातील सहारा सिटी, राज नगर इत्यादी भागात पाण्याची पातळी वाढल्याने घरांत पाणी शिरले असुन ज्यांची दुमजली घरे आहेत त्यांनी आपले साहित्य वरच्या मजल्यावर हलविणे सुरू केले तर प्रशासन त्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या प्रयत्नात आहे.

वास्तविक बघता शहरातील बराचसा भाग हा पूर क्षेत्रात येतो मात्र काही धनदांडग्यांनी त्या परिसरात शेती खरेदी करून धनशक्तीच्या बळावर त्या जमिनी अकृषक करून घेतल्या व तिथे भूखंड पाडून त्यांची नियमबाह्य विक्री केली. महसूल विभागाने त्या भागातील जमिनी अकृषक करताना नियमांचे उल्लंघन केले. तत्कालीन नगरपालिका व महानगर पालिकेने देखिल त्या भागात बांधकाम परवानगी देताना सारासार विचार न करता पूरक्षेत्रात बांधकाम परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी संबंधित भागात पुराचे पाणी घरात शिरते व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते त्याचप्रमाणे नागरिकांच्या मालमत्तेचेही नुकसान होते. ह्या सर्व बाबींचा विचार करून महसूल व महापालिका प्रशासन आतातरी शुद्धीवर येईल का? व भविष्यात त्या परिसरात लोकवस्ती वाढणार नाही ह्याची दक्षता घेणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये