अन्यायग्रस्त परिरक्षण भूमापक प्रशांत येते यांचे मनावर फार मोठा आघात
विभागाने तातडीने कुटुंबाला आधार द्यावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
भूमी अभिलेख विभागामध्ये सध्य परिस्थितीत मोजणी कामासह ऑनलाइन फेरफार आणि अद्यावतीकरणाची कामे तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवरील ड्रोन सर्वे चे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच प्रत्येक कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा आणि इंटरनेट व इतर तांत्रिक विभाग यामुळे भूमी अभिलेख खात्यामधील दैनंदिन कामे करताना कर्मचारी वर्ग प्रचंड दबावाखाली कामे करीत आहेत आणि खात्यामार्फत लादले जाणारे दैनंदिन कामाचे जीव घेणे उद्दिष्ट साध्य करताना अत्यंत कठीण परिस्थितीत आणि भीतीयुक्त वातावरणात शासकीय कामे करीत आहेत. याची खात्यामार्फत दखल न घेताच दर दिवसाला नवनवीन योजना आणि त्या योजनांचे उदिष्ट कर्मचाऱ्यांवर लादून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न गेल्या तीन वर्षापासून सातत्याने खात्यामध्ये सुरू आहे.
त्यातच प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये दलालांचा वर्ग मोठ्या प्रमाणात सक्रिय असून ही मंडळी कर्मचाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून प्रसंगी राजकीय पुढार्यांना आपल्या स्वार्थासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चुकीची माहिती देऊन लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांविषयी संभ्रम निर्माण करताना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आपण समाजसेवक असल्याचा आव आणून ही दलाल मंडळी अनेक शासकीय कार्यालयामध्ये धुडगूस घालताना दिसून येते. त्यांचा कोणत्याही तऱ्हेने आजपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बंदोबस्त झालेला नाही ही खेदाची बाब आहे. त्यामुळे ही दलाल मंडळी शासकीय कामकाजात सातत्याने व्यत्यय आणून कर्मचारी आणि अधिकारी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. अनेक प्रकरणात आपल्या स्वार्थासाठी राजकीय पुढाऱ्यांची दिशाभूल करून दबाव तंत्राचा वापर करण्यात येतो.
उपअधीक्षक भूमि अभिलेख हिंगणघाट कार्यालयात नुकताच एका मान्यवर लोकप्रतिनिधीने उपाधीक्षक भूमी अभिलेख हिंगणघाट कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांना टारगेट करून त्यांनी घेतलेल्या तथाकथित सभेत अधिकारी आणि कर्मचारी यांना धारेवर धरले. कर्मचाऱ्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना, रिक्त पदे योजने करिता दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा, मोजणी साहित्य, इंटरनेट सेवा, वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा ,आधी तांत्रिक बाबींची वरिष्ठाकडून खातरजमा न करताच कर्मचाऱ्यांना आम जनतेसमोर उघडे पाडून जाहीर रित्या कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण झाली असून. अन्यायग्रस्त परिरक्षण भूमापक श्री प्रशांत येते यांचे मनावर या घटनेचा फार मोठा आघात झाला असून त्यांनी विष प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, ही बाब अत्यंत निंदनीय असून शासकीय कर्मचाऱ्यांना अशाच रीतीने कामे करताना अपमानित केल्या जात असेल तर याची दाद कुठे मागावी हा प्रश्न आज सर्वसामान्य कर्मचारी वर्गात निर्माण झालेला आहे.
लोकप्रतिनिधींच्या आवाहनानुसार वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता आपल्या तलवारी घासून कामाला लागलेले आहेत. यातून झालेल्या चुका, झालेली दिरंगाई याची सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येऊ नये अशी संघटना खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख म.रा. पुणे यांना करीत आहे.
या घटनेचा विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटना तीव्र निषेध नोंदवित आहे.
या प्रकरणात चुकून चौकशी शिवाय कुठल्याही प्रकारची कारवाई अधिकारी कर्मचारी यांचे वर झाल्यास संघटनेस नाईलाजास्तव आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल.
श्रीराम खिरेकर, सरचिटणीस
विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटना अमरावती नागपूर.