ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरच्या नाट्यक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – जोरगेवार*

६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा थाटात सम्पन्न

चांदा ब्लास्ट

नाटक हे समाज जागृतीचे प्रभावी माध्यम आहे. समाजातील विविध समस्या सुध्दा या माध्यमातून सोडविल्या जातात. चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया या चार जिल्ह्यात विखुरलेली झाडीपट्टी रंगभूमी हे या परिसराचे सांस्कृतिक वैभव आहे. चंद्रपूरातील कलावंतांनी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करत अटकेपार झेंडे रोवले आहेत. त्यांचा कलाविष्कार उत्तरोत्तर यशस्वी व्हावा अशा शुभेच्छा देत या विभागाचा आमदार म्हणून कलावंतांच्या सोबत सदैव आहे व राहील तसेच चंद्रपूरच्या नाट्यक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन अशी ग्वाही आ. किशोर जोरगेवार यांनी दिली.

६२ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा स्थानिक प्रियदर्शिनी नाट्यगृहात २० नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. दीपप्रज्वलन आणि घंटानाद करून आ. जोरगेवार यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले .यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ . विद्याधर बन्सोड , निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय पवार , स्पर्धेचे परीक्षक श्री सुहास जोशी , सौ प्रतिभा पाटील , श्री संजय दखणे यांची उपस्थिती होती. कलावंत मंडळीनी पुरस्कारांच्या मागे न धावता उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना देण्यावर भर द्यावा व चंद्रपूरची रंगभूमी अधिक समृध्द करावी असे मत प्रा. डॉ विद्याधर बन्सोड यांनी व्यक्त केले. यावेळी श्री संजय पवार , परीक्षक श्री सुहास जोशी यांनी देखील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मराठी रंगभूमी अधिकाधिक समृद्ध व्हावी , कलावंत , तंत्रज्ञ यांच्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच त्यात यश येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन स्पर्धा समन्वयक श्री सुशील सहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री श्रीनिवास मुळावार यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर हम चंद्रपूर या संस्थेने अमेय दक्षिणदास लिखित चैताली बोरकुटे कटलावार दिग्दर्शित द कॉन्शन्स या नाटकाचा प्रयोग झाला. या प्रयोगाला नाट्यरसीक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये