ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीचा “वरदविनायक” विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक नगरापैकी एक असलेले ‘भांदक’ अर्थातच आजचे ‘भद्रावती’ विदर्भातील अष्टविनायकांच्या स्थळांपैकी एक आहे. येथे उपलब्ध असलेल्या अनेक मूर्ती आणि देवालये प्राचिनतेची साक्ष देतात. भद्रावती शहरापासून अगदी २ किलोमीटर अंतरावर असलेल्या गवराळा येथे प्राचीन श्रीगणेशाचे मंदिर आहे. गवराळ्याचा “वरदविनायक” हीच या मंदिराची ओळख. उत्तराभिमुख असलेल्या या मंदिरात ६ फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे पोट पोकळ असून ते सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वी धनसंपत्तीच्या लालसेने फोडण्यात आल्याची माहिती गवराळ्याची जुनी लोकं आजही देतात. त्यानंतर सिमेंटने गणेश मूर्तीचे पोट पूर्ववत करण्यात आले. संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेले हे पावन मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक भक्तांच्या मनोकामना गवराळ्याच्या “वरदविनायकाने” पूर्ण होत असल्याचे सांगण्यात येते.

“वरदविनायाक मंदिराचा इतिहास”

                   मंदिरातील खांबावर कोरलेल्या शिलालेख आणि ताम्रपट या मंदिराच्या प्राचिनतेची ओळख आहे. गणेश पुराणातही या मंदिराचे वर्णन केल्याचे आढळते. गणेशभक्त गुत्समद नावाच्या महान ऋषीने भगवान गणेशाचा वर मिळाल्याने त्यांचे पुण्य फेडण्यासाठी गणेशमूर्ती विराजमान केल्याचा उल्लेख आढळतो. यानंतर चालुक्यसम्राट आणि सहावा विक्रमादित्य यांनी इ.स.१०८७ ते ११२६ च्या कालखंडात येथे मंदिर बांधले असावे असे सांगितले जाते. समर्थ रामदास स्वामी हे चंद्रपूरहून रामटेक येथे जात असतांना गवराळा येथिल मंदिरात भेट दिली असल्याचीही माहिती जाणकारांकडून सांगितल्या जाते. विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथिल चिंतामणी गणेशानंतर ह्या वरदविनायकाचे स्थान विदर्भातील अष्टविनायकांपैकी फारच महत्वपूर्ण समजल्या जाते.वरदविनायकाचे मंदिर हे टेकडीवर असून चढण्याकरिता पायऱ्या आहेत. टेकडीवर लागून असलेल्या मागील बाजूस रेल्वे लाईन लगत महालात जाण्याकरिता एक भुयारी मार्ग असल्याचे जुने वयोवृद्ध लोकं सांगतात.

“यवनाश्व राजाची राजधानी गवराळा-भद्रावती”

              यवनाश्व (यवनाक्ष) राजाची राजधानी म्हणून गावराळ्याचा उल्लेख केला जातो. या टेकडीवर वरदविनायक विराजमान आहेत. तेथेच या राजांचे महाल होते.आजही या महालाची वैशिष्ट्ये याठिकाणी जाणवतात.वरदविनायक मंदिराच्या अगदी पायथ्याशी दगडात कोरलेली गुफा आजही अस्तित्वात आहे. या गुफेत कुंड असून यवनाश्व राजाच्या पत्नीचे म्हणजेच राणीचे न्हाणीघर असल्याचे या कुंडावरून भासवते.

“वरदविनायकांच्या सोबतीला हनुमानजी”

           श्री वरदविनायक गणेश मंदिराच्या अगदी समोरच हनुमानजींचे मंदिर आहे. या मंदिराला हजारो वर्षाचा कालखंड असल्याचे सांगितले जाते. हनुमान मंदिर पूर्वमुखी असून याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. तर समोरच एक भरपूर पाणी भरलेली विहीर आहे. हनुमान मंदिरापासून गणेश मंदिरापर्यंत भुयारी मार्ग असल्याचे वृद्ध मंडळी सांगतात.

“ऐतिहासिक, आसना तलाव”

     मंदिराच्या शेजारी एक तलाव आहे. हा तलाव ‘आसनाचा तलाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा प्राचीन व ऐतिहासिक तलाव एकेकाळी गवराळा येथिल ग्रामस्थांची तहान भागवित होते. संपूर्ण गावातील ग्रामस्थ या तलावाचे पाणी वापरत होते. मात्र आता या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.भद्रावती, गवराळा व अन्य परिसरातील श्रीगणेश, शारदा, दुर्गा उत्सवानंतर मूर्त्यांचे विसर्जनही या तलावात केले जात होते. आजही या तलावात येथिल नागरिक मनोभावे, मूर्त्यांचे विसर्जन करतात हे मात्र तेव्हढेच खरे.मात्र खासगी मालकी असलेले हे तलाव येथिल डेव्हलपर्सला काही वर्षांपूर्वी विकल्या गेले. मंदिराच्या बाजूला असलेल्या या तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास पर्यटनाच्या दृष्टीने आणि भाविकांची गर्दी खेचण्याकरिता अधिक महत्वाचे ठरेल.विकासाच्या दृष्टीने नगर प्रशासनाने हे तलाव स्वतः विकत घेऊन आपल्या ताब्यात घेण्याचा मानस केला असून निधीअभावी या तलावाचे सौंदर्यीकरण थांबले आहे. सौंदर्यीकरणानंतर याठिकाणी जलतरण, नौकानयन, बालविहाराची निर्मिती झाल्यास पर्यटनाच्या दृष्टीने भद्रावतीच्या विकासात आणखीच भर होईल.

“पर्यटकांकरिता भक्त निवासाची सोय”

          वरदविनायकांच्या पायथ्याशी असलेल्या पूर्वमुखी हनुमान मंदिराच्या अगदी बाजूलाच महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यटन विकास निधीतून भद्रावती नगर पालिकेने दूरवरून दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय सुंदर व सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असलेल्या भव्यदिव्य भक्त निवासाची सोय करून दिली. तद्वतच याच परिसरात सुलभ शौचालय, पकगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीला पर्यटकांच्या स्वागतासाठी भव्य प्रवेशद्वार, सिमेंट रस्ता, मंदिर परिसरात बगीचा,दुकान गाळे बांधून संपूर्ण परिसराची सजावट करण्यात आली. गणेश, शारदा, दुर्गा, विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचा परिसर स्वच्छ करून मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंतची जागा मोकळी करून दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये